नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष उपक्रमाद्वारे कायद्याचा बडगा उगारण्यात येत आहे. चारचाकी गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणारे केवळ दोन तासांच्या विशेष कारवाईत तब्बल ९०५ जण आढळून आले. रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यावर वाहतूक पोलीस विभाग भर देत आहे. यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून शुक्रवारी सीट बेल्ट मोहीम राबविण्यात आली.
दुपारी १२ ते २ या केवळ दोन तासांच्या विशेष मोहिमेत ९०५ जणांवर कारवाई करण्यात आली. चारचाकी गाडीचा अपघात झाल्यावर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी सीट बेल्टचा वापर न केलेला आढळून येतो. सीट बेल्ट हे प्रवाशांच्या सुरक्षेचे साधन असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १६ वाहतूक शाखांमधील कर्मचाऱ्यांनी एकूण ९०५ वाहन चालकांवर निर्णायक कारवाई केली.
हेही वाचा : उरण नगरपरिषदेची कचरा वाहने बंद पडू लागली, कर्मचाऱ्यांचा भर बाजारात दे धक्का
हेही वाचा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंदला पाठिंबा देण्याच्या तयारीत?
सीट बेल्ट हे प्रवाशांच्या सुरक्षेचे साधन आहे. दुर्दैवाने अपघात झाला तर प्रवाशांचा जीव सीट बेल्टमुळे वाचू शकतो. वाहतूक नियम हे सुरक्षेसाठीच असतात, त्यांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे