नवी मुंबई : वाढत्या काँक्रीटीकरणामुळे नवी मुंबईतील हिरव्या आच्छादनाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत असताना नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या कामांमुळेच शहरातील अनेक वृक्षांभोवती काँक्रीटचा फास आवळला जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबई आणि ठाणे शहरात वृक्षांच्या भोवती टाकण्यात आलेले काँक्रीटचे आवरण तातडीने हटवावे यासाठी उच्च न्यायालयाने नुकतेच स्थानिक महापालिकांना आदेश दिले आहेत. या दोन शहरांना लागूनच असलेल्या नवी मुंबईत मात्र या आघाडीवर महापालिकेचा पूर्णपणे कानाडोळा होत असल्याचे चित्र आहे.
वाशी विभागात बॅनरबाजीसाठी मध्यंतरी झाडांवर खिळे ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. शहर अभियंता विभागामार्फत या झाडांभोवती करण्यात आलेले काँक्रीटीकरणही सातत्याने वादात सापडते आहे.
खोडाभोवती काँक्रीटीकरण तसेच पेव्हर ब्लॉकच्या आवरणामुळे मुळांची वाढ खुंटते. तसेच झाडांची मुळे खोलवर जात नाहीत. त्यामुळे झाडे उन्मळून पडतात असे पर्यावरणवाद्याांचे म्हणणे आहे. या पावसाळ्यात अवघ्या दोन महिन्यांत २०३ झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.
हेही वाचा : सिडकोच्या उरणमधील तिन्ही रेल्वे पुलांवर विजेचा लपंडाव, प्रवाशांचा अंधारातून धोकादायक प्रवास
यातील बऱ्याचशा घटना या मुळाभोवती केलेल्या काँक्रीटीकरणामुळे झाल्याच्या तक्रारी पुढे येत असून फांद्या छाटण्याची कामेही संथगतीने होत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. पालिकेच्या काँक्रीटीकरण, पेव्हरब्लॉक लावण्याच्या प्रकाराविरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांनी आंदोलनही केले होते. उद्यान विभागामार्फत शहर अभियंता विभागाला झाडांभोवती चारही बाजूंनी एक मीटर जागा सोडण्याबाबत सूचित करण्यात येईल, असे उपायुक्त दिलीप नेरकर, यांनी सांगितले.
हेही वाचा : जालना येथील घटनेचे पडसाद कायम, वाशीत आघाडीने केली निदर्शने
यंदाच्या पावसाळ्यात २०३ झाडांचा बळी
महापालिका क्षेत्रात २०१६ मध्ये वृक्षगणना करण्यात आली. त्यावेळी ९ लाख ४७ हजार वृक्षांची नोंद झाली होती. शहरात यंदाच्या पावसाळ्यात पदपथावरील २०३ झाडांचा बळी गेला आहे. जूनमध्ये १०६ झाडे, जुलैमध्ये ८७ झाडे, तर ऑगस्टमध्ये ९ वृक्षांचा बळी गेला आहे.
नुकसान झालेल्या झाडांची ठिकाणे
बेलापूर, सीवूड्स, नेरुळ वंडर्स पार्क तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर, वाशी सेक्टर १६, पामबीच सतरा प्लाझासह शहरातील विविध विभागांतील पदपथांवर असेच प्रकार पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा : खारघरमध्ये एनएमएमटी बसला आग, सुदैवाने जिवितहानी नाही, प्रवासी सुखरूप
‘शहरात पालिकेच्या अभियंता, उद्यान विभागाकडे पेव्हर ब्लॉक व काँक्रीटीकरणामुळे झाडांची वाढ खुंटते. झाडांच्याभोवती चारही बाजूंना एक ते दीड मीटर जागा सोडून त्यात माती टाकली पाहिजे. परंतु पालिका ठेकेदार झाडांच्या खोडाभोवतीपर्यंत काँक्रीटीकरण करतात तसेच पेव्हरब्लॉक टाकतात. झाडांची मुळे सिमेंटमुळे कुजतात. त्यामुळे झाडे मरतात’, त्यांचे आयुर्मानही घटते, असे वृक्षप्रेमी आबा रणावरे यांनी म्हटले आहे. ‘पदपथावरील झाडांभोवती पेव्हरब्लॉक व काँक्रीटीकरणामुळे झाडे मरतात, मुळांची वाढ खुंटते. पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. नागरिकांनी झाडांचे संवर्धन करावे’, असे आवाहन हरित नवी मुंबई संस्थेच्या प्रमुख आरती चौहान यांनी केले आहे.