नवी मुंबई : रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रकचालक रस्त्यावर उतरले असून जेएनपीटीकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत मार्ग मोकळा केला आहे. मात्र यामुळे कोंबडभुजा ते किल्ले गावठाण पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. रस्ते अपघातात ज्या गाडीने धडक मारली त्यातील लोकांनी अपघातग्रस्तास मदत केली नाही तर त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल असा कायदा करण्यात आला आहे. असा दावा करीत या कायद्याविरोधात ट्रक, डंपर, कंटेनर चालकांनी जेएनपीटीकडे जाणारा मार्ग रोखून आंदोलन छेडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सिडको विरोधात एल्गार; जमीन संपादनाला नागाव, केगाव, चाणजेसह इतर गावातील नागरिकांचा विरोध

जेएनपीटीतून प्रचंड प्रमाणात रोज आवक जावक होत असल्याने या ठिकाणी आंदोलन केले असता सरकारला जाग येईल या उद्देशाने कोंबडभुजा गावा लगत असलेल्या जेएनपीटी मार्गावर सकाळी चक्का जाम करण्यात आले होते. अशी माहिती स्वरूप दिगवा या ट्रक चालकाने दिली. रात्रभर नववर्षाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना या आंदोलनाकडे मोर्चा वळवावा लागला. एनआरआय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत ट्रक चालकांची समजूत काढत मार्ग मोकळा केला. मात्र आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु ठेवली होती. सकाळी साडे अकरा नंतर मात्र परिस्थिती पुर्ववत झाली. अशी माहिती एनआरआय पोलिसांनी दिली. 

हेही वाचा : गौतम नवलखा यांची पुन्हा चौकशी? भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आहेत नजर कैदेत…

या आंदोलनावर बाल सिंह (आखिल भारतीय ट्रक संघटना अध्यक्ष) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे आंदोलन चालकांनी उत्स्फूर्तपणे केले आहे. संघटनेचे अधिकृत आंदोलन अद्याप सुरू झालेले नाही. अपघातग्रस्तास मदत करण्याची इच्छा आमचीही असते. मात्र, अशा वेळी आमची चूक नसताना परिसरातील नागरिक हल्ला करतात. प्रसंगी आमचे वाहन पेटवले जाते. अशा वेळी जीव वाचवण्यासाठी आमच्या चालकांना पळून जावे लागते. अपघातास कारण असल्यास शिक्षा ठोठवा, त्याला आमचा विरोध नाही. मात्र, अपघातग्रस्तास मदत करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी हल्ला केला तर कोण जबाबदार असणार? याबाबत उद्या (मंगळवारी) राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे बैठक आयोजित केली आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरेल”, असे बाल सिंह यांनी म्हटले आहे.  

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai truck drivers protest against central government s law of 10 years regorous imprisonment jnpt road blocked css
Show comments