नवी मुंबई: नवी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असून १०७ पदाधिकारी दोन माजी नगरसेवक, मनपातील एक माजी विरोधीपक्षनेता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यासाठी सानपाडा येथे जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्या नंतर नवी मुंबईतही शिवसेना उपनेते विजय नाहाटा विरोधीपक्ष नेते व जिल्हाधिकारी विजय चौगुले सह अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. असे असले तरीही नवी मुंबईतील जुने कट्टर शिसैनिक म्हणून ओळख असलेल्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात गेले नाहीत. जे शिंदे गटात गेले ते नव्याने सत्तेसाठी शिवसेनेत आलेले होते त्यामुळे आमची मूळची शिवसेना अबाधित आहे असे अभिमानाने उद्धव ठाकरे गटाचे नेते सांगत होते.
हेही वाचा… स्वस्तात डॉलर मिळतात म्हणून बायकोचे दागिने गहाण ठेवले… आणि हाती आली कागदाची पुडके
मात्र आता असेच कट्टर समजले जाणारे उद्धव ठाकरे गटाचे तब्बल १०७ पदाधिकारी दोन माजी नगरसेवक , एक माजी विरोधीपक्षनेता, तसेच एक शहर प्रमुख याशिवाय शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यासाठी सोमवारी संध्याकाळी सानपाडा येथे जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे बेलापूर विधानसभा अध्यक्ष विठ्ठल मोरे यांना छेडले असता, त्यांनी याबाबत उद्या (मंगळवारी) वाशीतील शिवसेना मुख्यालयात आपली बाजू सविस्तर मांडू असे सांगितले.