उरण : उरण ते उसर या गेलच्या वायु वाहिनीला उरणसह पेण तालुक्यातील अकरा गावातील शेतकऱ्यांनीही विरोध केला आहे. त्याकरिता पेणमधील गाव बैठकांना सुरुवात झाली आहे. गेल भूसंपादन पारदर्शक पद्धतीने करा, गेल (गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया) यांच्या वायु वाहिनीसाठी भूसंपादन करताना पारदर्शकता आणावी, शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे अशी मागणी रविवारी पेण येथील कणे येथे झालेल्या बाधीत शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. उरण , पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील अनेक गावांमधून गेल कंपनीची प्रोपेनची वायु वाहिनी उरण ते अलिबाग मधील उसर प्रकल्पाकरीता टाकली जाणार आहे.
याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन होणार आहे. मात्र जमीनीची किंमत फक्त १० टक्केच देणार असल्याचे भूसंपादन अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नोकरी देण्यासंबंधी काही स्पष्टता दिली जात नाही. मात्र एकदा का ७/१२ उताऱ्यावर पाईप लाईनची नोंद झाली की त्या जमीनीचा वापर फक्त आणि फक्त भातशेती म्हणूनच राहणार आहे का ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेती व्यतिरिक्त काहीही करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे! संघटीत होऊन आपल्या न्याय हक्क मिळविण्यासाठी संघर्षाची तयारी करु, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
हेही वाचा : पिरवाडी किनाऱ्यावर वाळूत रुतला डम्पर; जलसमाधी मिळता मिळता वाचला
यामध्ये भूसंपादन अधिकारी नेमणूक अधिसूचना,कोणत्या कायद्याने भूसंपादन होणार, किती मोबदला मिळणार याची स्पष्टता देण्याची मागणी या निमित्ताने शेतकऱ्यांनी केली आहे. पेण तालुक्यातील ११ गावाचा गेलच्या वाहिनीला सरकारने लादलेल्या गेल कंपनीचा प्रकल्प काय आहे? त्याचे परिणाम काय होतील? त्यांनी दिलेल्या ६ (१ ) नोटीसला हरकत कशा प्रकारे घेता येईल? लढा कसा करावा लागेल? याचे मार्गदर्शन किसान सभेचे नेते कॉ. संजय ठाकूर, रामचंद्र म्हात्रे यांनी कळवे कणे व मसद बु . येथे झालेल्या बैठकीत केले. यावेळी पेणमधील सर्व संघटनांचे अध्यक्ष दिलीप पाटील, अनंत पाटील, उपाध्यक्ष कॉम्रेड काशिनाथ पाटील, सचिव आर के पाटील, सुधाकर मोकल, बाळा पाटील, हरिश्चंद्र पाटील, राजन झेमस, प्रकाश ठाकुर, विजय पाटील,सुर्या पाटील, प्रसाद पाटील,लव्हेंद्र मोकल,हरिभाऊ घरत व शेतकरी उपस्थित होते .