उरण : बहुप्रतिक्षित उरण ते खारकोपर लोकलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते होणार असल्याचे संकेत ऑगस्टमध्ये लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये खारघरमध्ये नवी मुंबईतील मेट्रोच्या लोकार्पणासाठी पंतप्रधानांच्या भेटीची तयारी सुरू झाली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा उरण ते खारकोपर या व नेरुळ ते उरण लोकल मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाचीही चर्चा रंगली आहे. मात्र या संदर्भात रेल्वे विभागाकडे कोणतीही माहिती नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी ऑगस्टमध्ये उरण खारकोपर रेल्वे मार्ग उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे उरणकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र खारघरमध्ये ऑक्टोबरच्या मध्यावर पंतप्रधान येत आहेत. त्यामुळे यावेळी उरण ते खारकोपर मार्गाचे ही लोकार्पण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा : कामोठेत महिनाभरात डेंग्यूचा दूसरा बळी
नवी मुंबईचाच भाग असलेल्या उरण ते खारकोपर लोकलवरील गव्हाण रेल्वे स्थानकाचे कामही पूर्ण होणार आहे. ही लोकल सेवा मागील पंचवीस वर्षांपासून रखडल्याने येथील नागरिकांची ती सुरू होण्याची आतुरता शिगेला पोहचली आहे. तर अनेक अडथळे पार करीत नवी मुंबईतील महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या उरण मधील विद्यार्थ्यांसाठी लोकल सुरू होण्याची अपेक्षा लागून राहिली आहे.
हेही वाचा : एन.एम.एम.टी बसच्या टायरने पेट घेतला, बस चालकाचे प्रसंगावधान आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीमुळे अनर्थ टळला…
यापूर्वी ही सेवा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व जून आणि ऑगस्ट महिन्यात सुरू होणार असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामध्ये दस्तुरखुद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही लोकल लवकरात लवकर सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण होणार असल्याने त्याचवेळी उरण ते खारकोपर लोकलचे उद्घाटन होणार असल्याची उत्सुकता उरण मधील नागरिकांना लागली आहे. या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याची सूचना आपल्याला आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.