उरण : तेल गळतीमुळे शेती आणि मच्छिमारांचे होणारे नुकसान भरून द्या आणि नागरिकांना सुरक्षित करा, या मागणीसाठी येथील स्थानिकांनी गळती झालेले तेल भरण्याचे काम बंद करून आक्रोश केला. त्यामुळे ओएनजीसी व स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. शुक्रवारी ओएनजीसीच्या उरण प्रकल्पातून झालेल्या तेल गळतीमुळे नागावमधील शेतकरी आणि मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पातून वारंवार होणाऱ्या गळतीने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या विरोधात रात्री उशिरा ग्रामस्थांनी आंदोलन केले.
हेही वाचा : शाळकरी मुलींची छेड काढणारा गजाआड
तेल गळती ही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाली असून लाखो लीटर तेल समुद्रात वाहून गेले, त्यामुळे देशाचे करोडो रुपये नुकसान झाले, याला जबाबदार कोण? ऑईल इतक्या प्रमाणात बाहेर येत होतं की आजूबाजूच्या परिसरातील भातशेतीत जाऊन भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच समुद्रात ऑईल जाऊन मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले, ऑईल इतके ज्वलंत होते की, एकदा माचिसची कांडी पेटली असती तरी उरणचा भोपळ होण्यासाठी फक्त एक मिनिट लागला असता, असे प्रश्न करीत नागावमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका पाटील, वैभव कडू, जितेंद्र ठाकुर व स्थानिक महिला, शेतकरी, मच्छीमारांनी आंदोलन केले. तेल गळतीनंतर स्थानिकांनी केलेल्या मागणीनुसार शेती आणि मच्छिमार यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ते ओएनजीसी प्रशासनाला दिले जातील, अशी माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.