उरण : दिघोडे ते वेश्वि रस्त्यावर मंगळवारी कंटेनर वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आणि ग्रामस्थांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या नवी मुंबई व मुंबईतून गोवा महामार्गावर जाण्यासाठी उरणच्या गव्हाण कडून दिघोडे रस्ता सोयीचा व कमी अंतराचा ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहनात वाढ झाली आहे. मात्र या रस्त्यांवर दररोज होणाऱ्या कंटेनर वाहतुकीच्या नियमबाह्य कोंडीचा परिणाम प्रवास करणाऱ्या वाहनांवर होऊ लागला आहे. त्यामुळे कमी अंतराचा मार्ग सोडून पनवेल मार्गाने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. तर दुसरीकडे या कोंडीमुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या अपघातात ही वाढ झाल्याने जीवाला धोका निर्माण झाला आहे.

उरण हे जेएनपीटी बंदरातील सर्वात अधिक कंटेनर हाताळणीमुळे कंटेनर शहर बनले आहे. या कंटनेर वाहनांवर कोणतेच नियंत्रण नसल्याने कंटेनर वाहनांच्या धडकेत वाहन चालक जखमी होण्याच्या व वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना या रोजच्याच झाल्या आहेत. उरणच्या ग्रामीण भागातील अनेक गावांना या कंटेनर गोदामानी विळखा घातला आहे. त्यामुळे गावातून प्रवास करणेही धोकादायक बनले आहे. येथील चिरनेर ते गव्हाण फाटा या मार्गावरील चिरनरे, भोम, विंधणे, कंठवली, दिघोडे, वेश्वि, गावठाण, जांभूळपाडा ते थेट गव्हाण फाटा या रस्त्यावर अनेक कंटेनर गोदामे आहेत.

हेही वाचा : जगातील अत्याधुनिक बंदरातील रस्ते चिलखमाती आणि खड्डेमय; प्रवासी वाहने, नागरिक आणि मालवाहतूकदारही त्रस्त

या गोदामातून मालाची ने-आण करण्यासाठी ज्या कंटेनर वाहनांचा वापर केला जातो अशी वाहने वाहतुकीचे नियम डावलून वाहतूक करीत आहेत. या अवजड वाहनांच्या वाढत्या व नियमबाह्य वाहतुकीच्या परिणामी दिघोडे, जांभूळपाडा, वेश्वि आणि गव्हाण फाटा दरम्यानच्या रस्त्यावर दररोज किमान एक तरी अपघात होतो. त्यामुळे उरणमधून व उरण मार्गाने गोवा, अलिबाग तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही कोंडीची व अपघाताची समस्या दूर करण्यासाठी येथील प्रशासन, वाहतूक विभाग, ग्रामपंचायत व गोदाम चालक यांच्यात समन्वय घडवून आणण्याची व येथील वाहतूक आणि प्रवास सुरळीत करण्याची मागणी प्रवासी व वाहनचालक यांच्याकडून केली जात आहे.

Story img Loader