नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम करताना सार्वजनिक रस्ता तसेच पदपथाचा वापर करू नये तसेच बांधकाम साहित्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण केल्यास कारवाई करण्याचा नियम असताना वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मनमानीकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सूर्यास्तानंतर बांधकामांना बंदी घालणारी नियमावली महापालिकेने जाहीर केली असली तरी त्याकडे बांधकाम व्यावसायिक काणाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे तसेच नव्या इमारतींचे मोठमोठे टॉवरची बांधकाम सुरू आहेत. वाशी उपनगरात पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प सुरू असून वाशी सेक्टर २ परिसरात मेघदूत सिनेमा, अबॉर्ट हॉटेल परिसरात अक्षर व भगवती डेव्हलपर्सचे काम सुरू आहे. मागील अनेक महिन्यांपासून या परिसरातील पदपथच बांधकाम व्यावसायिकाने ताब्यात घेतल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: अवघ्या पंधरा मिनिटात दोन साखळी चोरी, २ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरी 

वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बांधकाम व्यावसायिकाचे बांधकामाचे साहित्य तसेच यंत्रे पदपथावरच ठेवलेली आहेत. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी चालायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे पदपथावरच साहित्य ठेवले असताना रस्त्यातील अर्ध्या भागातही अडथळेही उभे केले आहेत. त्यामुळे वाशी सेक्टर २, ३ परिसरातील पदपथ हा पालिकेने व्यावसायिकाला आंदण म्हणून दिला आहे, असा येथे फलकच लावावा, असे मत व्यक्त करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

वाशी सेक्टर २, ३ परिसरातून नागरिकांची वर्दळ असते. परंतु तक्रार करूनही पालिका अधिकारी फक्त कारवाई करतो असे आश्वासन देतात, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. सीवूड्स परिसरातही एका बांधकाम व्यावसायिकाने चक्क पालिकेच्या पदपथावरच आपले कार्यालय थाटले होते. याबाबत आवाज उठवल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने तात्काळ कार्यालय आतमध्ये सरकवले. मात्र काही दिवसांनंतर आता हे बेकायदा कार्यालय पदपथाच्या दुसऱ्या बाजूला पालिका व सिडको हद्दीतील जागेतच हलवण्यात आले आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: हुक्का पार्लरवर धाड, तीन जणांवर कारवाई 

सीवू्डस, पामबीच मार्गालगत तसेच वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे विभागांत बांधकाम व्यावसायिकांची पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी सुरू असल्याचे चित्र आहे. सीवूड्स सेक्टर ४६ परिसरात डेल्टा तसेच गामी या बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकामामुळे व सततच्या ब्लास्टिंगमुळे शेजारच्या सिडको वसाहतीमधील हजारो कुटुंबे त्रस्त असून पालिकेने शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी सकाळी ९ नंतर काम सुरू करायचे व सायंकाळी सूर्यास्तानंतर काम बंद करायचे असा नियम केला असला तरी त्याची अंमलबजावणी कितपत होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. कारण वाशीसारख्या अत्यंत रहदारीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही ४ महिने फक्त पालिका बघ्याची भूमिका घेत असेल तर नियम फक्त कागदावर लिहिण्यापुरतेच बनवायचे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांना विचारणा केली असता पालिकेने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून कायद्याची अमंलबजावणी करून दाखवावी असा संताप व्यक्त केला आहे.

बांधकाम वेळेबाबत फलक आवश्यक

नवी मुंबई महापालिकेने तसेच सिडकोने बांधकामे व खोदकामांबाबतच्या वेळेबाबत स्पष्ट उल्लेख परवानगी पत्रात तसेच बांधकामाच्या ठिकाणी तशा स्वरूपाचा फलक लावणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करावे. बहुतांश ठिकाणी रात्री-अपरात्रीही विविध बांधकामांच्या ठिकाणी कानठळ्या बसवणाऱे आवाज तसेच स्फोटांचे प्रकार सुरू असल्याचे पाहायला मिळते. शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. सर्वच विकासकांच्या किंवा पुनर्विकासाच्या कामाला बांधकाम परवानगी देताना कोणत्या वेळेत काम करण्यात यावे, याचा सुस्पष्ट उल्लेख फलकावर करावा, अशी मागणीही नागरिक करीत आहेत.

हेही वाचा : पहिल्याच जोरदार पावसाने पुन्हा एकदा उरण रेल्वे स्थानक पाण्यात बुडाले; प्रवाशांचे हाल सुरू, रेल्वेने पंप लावून ही पाणी साचले

वाशी सेक्टर २ परिसर म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या व मध्यवर्ती ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरू असून या ठिकाणाहून हजारो नागरिक ये-जा करतात. परंतु या परिसरात बांधकाम व्यावसायिकाने चक्क रस्त्यावरच बांधकामासाठीचे मशीन, साहित्य ठेवले आहे. हा रस्ता पालिकेने बिल्डरला आंदण दिला आहे का ? विशेष म्हणजे गेल्या ४ महिन्यांपासून तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे पालिका फक्त कागदावर नियम करते पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य असते.

राजीव देशपांडे, नागरिक, वाशी

शहरात सर्वत्र बांधकाम व्यावसायिकांनी पदपथ अडवून ठेवले आहेत. पदपथ अडवल्याबद्दल दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. जेवढे दिवस साहित्य ठेवून रस्तास, पदपथ अडवला असेल तेवढी रक्कम पालिकेने त्याच्याकडून वसूल करायची असते. परंतु महापालिका अधिकारी काणाडोळा करत असल्याचे आढळते.

संदीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा : पनवेलमध्ये १ मेट्रीक टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी पदपथांवर अतिक्रमण केले असेल व पदपथावर बांधकाम साहित्य ठेवले असेल तर याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल.

शिरीष आरदवाड, शहर अभियंता

महापालिकेने अनधिकृत बांधकामाची व संबंधित ठिकाणांची पाहणी करून पदपथांवरच बेकायदा थाटलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

शशिकांत तांडेल, साहाय्यक आयुक्त, बेलापूर विभाग