नवी मुंबई: मुंबई उपनगरांसह नवी मुंबई शहरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता. सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचले होते. बाजार आवारात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पाणीच पाणी झाले होते. त्याचबरोबर कांदा बटाटा बरोबर पाचही बाजारात जागोजागी पाणी साचले होते. कांदा बटाटा मोठया प्रमाणात पाणी भरल्याने पहिल्याच पावसात एपीएमसी मधील नालेसफाईची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे.
एपीएमसी मधील बाजार समिती ही मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे ही उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे. बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारात व परिसरात पाणी साचले होते. एपीएमसी बाजारातील मलनिस्सारण वाहिन्या, चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने हे पाणी साचले आहे. बाजारात नाल्याची सफाई योग्यरीत्या झाली नसल्याने बाजार आवारात ठीक ठिकाणी पाणी साचले होते. ठेकेदाराकडून दाखवण्यासाठी नालेसफाई केली जाते, चेंबर ते चेंबर सफाई होत नाही, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : सिडको मंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती
एपीएमसी प्रशासनाकडून बाजार आवारात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामासाठी १२ लाखांचा ठेका दिला जातो त्याच बरोबर चार महिने नाल्याची देखभालीचा समावेश आहे. मात्र ठेकेदारामार्फत एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व नालेसफाई योग्यरीत्या होत नसल्याने बाजारात पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे.