नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच थंडगार शीतपेय, रसाळ फळांना अधिक मागणी असते. यंदा तर अधिक उष्मा आहे. मात्र असे असताना देखील सध्या बाजारात आंब्याचा हंगाम सुरू असल्याने कलिंगडची मागणी रोडावली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात कलिंगड दाखल होण्यास सुरुवात होते तर मार्च-एप्रिलपासून मागणीत वाढत होते.
सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत शरीराला थंडावा देणारी कलिंगड बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, तिची चव चाखण्यासाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसीत सध्या महाराष्ट्रसह तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून आवक होते. सध्या बाजारात कलिंगडच्या १०० ते १३० गाड्या दाखल होत आहेत.
हेही वाचा : अतिरिक्त फीसाठी निकाल राखीव, उरणमध्ये पालक संघटनेची शाळेविरोधात पोलिसांत धाव
घाऊक बाजारात प्रतिकिलोला ११ते १२ रुपये दर आहेत. तेच एप्रिल मध्ये १५ ते १६ रुपये बाजारभाव होते. एपीएमसीत आता आंब्याची आवक जास्त होत असून इतर फळांची मागणी कमी आहे. बहुतांशी ग्राहक आंबा खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे बाजारात कलिंगडला म्हणावी तशी मागणी नाही.
हेही वाचा :उरण: कोरड्या पाणवठ्यात वन्यजीवांसाठी पाणी भरण्याचा उपक्रम
एपीएमसी घाऊक बाजारात सध्या आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहक आंबा खरेदीला पसंती देत असून कडक उन्हाळा असूनही रसाळ कलिंगडाची मागणी कमी आहे.
मुर्तीझा खान, कलिंगड व्यापारी, एपीएमसी