नवी मुंबई : नवी मुंबईत राहणाऱ्या एका महिलेचे पतीसमवेत पटत नसल्याने ती मुंबईत एकटी राहत होती. दरम्यान अन्य एका पुरुषाने तिच्या आजारपणात मदत करून विश्वास संपादन केला. मात्र ४५ लाखांची फसवणूक करून तो तिचा शारीरिक मानसिक छळ करीत असल्याने तिने शेवटी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तुलसी जाधव असे यातील आरोपीचे नाव आहे. पतीपासून विभक्त होऊन चेंबूर येथे एक महिला राहत होती. या महिलेचा व जाधव यांचा परिचय समाज माध्यमातून झाला. मैत्री विनंती महिलेने मान्य केली व दोघांची मैत्री झाली. जाधव हा सुद्धा विवाहित असून पत्नीपासून घटस्फोट घेतला असल्याचे त्याने महिलेला सांगितले होते.
कालांतराने भेटी गाठी वाढत गेल्या. दरम्यान हि महिला आजारी पडली. त्यावेळी रुग्णालयात ने-आण करणे व इतर मदत जाधव याने केली. त्यामुळे महिलेस त्याच्यावर विश्वास बसला. आजारातून पूर्णपणे ठीक झाल्यावर जाधव याने लग्नाचा प्रस्ताव समोर ठेवला. मात्र घटस्फोट घेतल्याशिवाय हे शक्य नसल्याचे सदर महिलेने जाधव यांना सांगितले. काही दिवसांनी तुला घर घेऊन देतो असे सांगून जाधवने महिलेकडून कोऱ्या धनादेशावर सह्या घेतल्या. त्याद्वारे पंचेवीस लाख स्वतःच्या खात्यात वळवले. तसेच नवी मुंबईत भाड्याने घर घेत एकत्र राहणे सुरु केले. येथेही गोड बोलून चोरी होण्याची भीती दाखवत २४ तोळे सोन्याचे दागिने बँक लॉकरमध्ये ठेवतो सांगून स्वतःकडे ठेवले.
काही महिने गेल्यावर पुन्हा मुंबईत भाड्याने घर घेऊन राहणे सुरु केले. त्याही ठिकाणी कार घेतली असून ताब्यात घेण्यासाठी ११ लाख रुपये महिलेकडून घेतले. त्या नंतर मात्र त्रास देणे सुरु केले. यात पहिल्या नवऱ्याशी बोलणे सोड तसेच मुलाशी संपर्क तोड, असे जाधवने महिलेला सांगितले. तसेच पीडित महिलेचा मोबाईल त्याने स्वतःकडे ठेवणे सुरु केले. याशिवाय कुठलेही कारण करून त्याने महिलेला मारहाणही सुरु केली. शेवटी कंटाळून सदर महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२० पासून आता पर्यंत एकूण ३६ लाख रुपये व २७ तोळे सोने अशी एकूण ४५ लाख रुपयांची फसवणूक करून घेतल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे.