नवी मुंबई ः नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या धावपट्टीवरील भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेली सिग्नल चाचणी व इन्स्ट्रूमेंट लॅंडिंग सिस्टीम चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर पुढील १० दिवसात म्हणजेच ५ ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हवाईदलाचे लढाऊ विमानाची (सूखोई) चाचणी विमानतळावर घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सिडको भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची मंगळवारी सिडकोचे अध्यक्ष शिरसाट यांनी पाहणी केली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल,सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, दिलीप ढोले, मुख्य व्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प व विशेष प्रकल्प) शीला करुणाकरन, अदानी समुहाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. पुढील सहा महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले विमानोड्डान होणार याबाबतची अपेक्षा उंचावल्या आहेत.
राज्यात विधानसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सिडकोचे अध्यक्ष शिरसाट यांच्या हाती अतिशय कमी दिवस सिडकोचा कारभार असल्याने त्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेण्याचा सपाटा लावला आहे. अध्यक्ष शिरसाट यांनी मंंगळवारी पत्रकारांना माहिती देताना ५ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हवाई दलाचे पहिले विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरल्यानंतर सरकार हे विमानतळा मार्च महिन्यात प्रादेशिक वाहतूकीसाठी खुले करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगीतले. त्यानंतर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय विमाने या विमानतळावरील धावपट्टीवरुन उडावीत, असे नियोजन अदानी समुह आणि सिडको मंडळाचे असणार आहे. या विमानतळामुळे नवी मुंबईसह राज्याच्या विकासात मोठा हातभार लागणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये एकाचवेळी साडेतीनशे विमाने उभी करु शकतो एवढ्या क्षमतेचे हे विमानतळ आहे. तसेच या विमानतळात चार वेगवेगळे टर्मिनल असून हे चारही टर्मिनल आपसात जोडले असल्याने प्रवाशांना एका टर्मिनलमधून दूस-या टर्मिनलमध्ये जाण्यासाठी अंतर्गत प्रवासाचा मार्गाचा पर्याय असणार आहे.
हे ही वाचा… चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्मारकांची दुरवस्था बांधकाम विभाग, पंचायत समितीचे दुर्लक्ष
विमानतळापर्यंत प्रवाशांना जाण्यासाठी रस्त्यांसोबत कोस्टलमार्ग आणि भविष्यात मेट्रो व बूलेटट्रेन असे वेगवेगळे परिवहनाचे पर्याय दिल्याने देशातील विविध मार्गिकांशी जोडलेले हे एकमेव विमानतळ असणार आहे. दोन धावपट्या विमानतळात असून पहिल्या धावपट्टीचे काम जवळपास पुर्ण झाले असून यापूर्वी विविध चाचण्या या धावपट्टीवर घेतल्या गेल्या आहेत. हवाई दलाचे नेमके कोणते विमान चाचणीसाठी ऑक्टोबर महिन्यात येणार यासाठी हवाईदलाकडे पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्याप तरी नेमके कोणते विमान येईल याची माहिती सिडकोने दिली नाही.
११६० हेक्टर क्षेत्रावर हे देशातील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असून दोन टप्प्यांमध्ये त्याची उभारणी होत आहे.प्रती वर्ष ९० दशलक्ष प्रवासी आणि अडीच लाख मेट्रीक टन मालवाहतुक या विमानतळावरुन होऊ शकेल. विमानांच्या स्वतंत्र प्रवर्तानाकरिता दोन समांतर धावपट्ट्या आणि पूर्ण लांबीचे पंधरा – पंधरा मीटर रुंदीच्या प्रशस्त दोन समांतर टॅक्सी येजा करण्यासाठी मार्गिका असणार आहेत. त्यामुळे विमानतळ ते विमान हा प्रवास तातडीचा होईल. मुंबई विमानतळ उभारणीवेळी झालेल्या चुकांची दुरुस्ती येथे करण्यात आली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीतून हे विमानतळ विकसित करण्यात येत असून विमानतळाच्या विकासाची जबाबदारी सवलतधारक कंपनी ‘एनएमआयएएल’ यांच्यावर आहे.
“सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा प्रकल्प आहे. नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानाकारक आहे. प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच येथून विमानाचे उड्डाण होणार आहे.” संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको मंडळ