उरण : जैवविविधतेने नटलेल्या व पक्षी निरीक्षणाचे ठिकाण असलेल्या उरणमधील पाणजे येथील वादग्रस्त २८९ हेक्टर पाणथळ परिसरात येणारे आंतरभरती पाण्याचे प्रवाह बंद करण्यात आल्याने ही पाणथळ कोरडी झाली आहे. येथील अधिकारी निवडणूक कर्तव्यावर असल्याने दुर्लक्ष होत असलेल्या पर्यावरणवाद्यांनी दावा केला आहे. या संदर्भात पर्यावरण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
हा कालावधी परदेशी स्थलांतरित पक्षी येण्याचा आहे. पाणथळी कोरड्या झाल्याने पक्षी संख्या ही घटण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळातही, उरण आणि वाशीमध्ये मोठ्या ओल्या जमिनी आणि खारफुटीचे पट्टे गाडले गेले होते. त्यानंतरच्या अधिकृत तपासणीनंतर नुकसानीची शहानिशा करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याबद्दल पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी खेद व्यक्त केला.
हे ही वाचा… एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
११ नोव्हेंबर २०२० च्या राज्य पर्यावरण संचालकांच्या आदेशानुसार, सिडकोने पाणथळ जमिनीवर भरतीच्या पाण्याचा प्रवाह कायम ठेवायचा होता. तरीही नगररचनाकार त्याचे उल्लंघन करत आहेत, असे सागर शक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जैवविविधता निर्देशांकात भारत १८० देशांपैकी १७६ व्या क्रमांकावर आहे आणि आम्ही पाणजेची जैवविविधता पुन्हा निर्माण करायला सुरुवात केली आहे, असे मत नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा… शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
तीस स्थलांतरित पक्ष्यांसह किमान ५० प्रजातींचे पक्षी आकर्षित करणारी पाणजे पाणथळ आता आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात मृत पावत असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर पाणजे पाणथळ जमीन नष्ट झाल्याने उरणवर आपत्ती ओढवू शकते. कारण समुद्र भरतीचे येणारे पाणी इतरत्र गेले तर पूर येईल. आंतरभरतीयुक्त ओलसर जमीन पुरल्यामुळे गावांमध्ये आधीच अवेळी पूर येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाणजे पाणथळ जमिनीचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की खारफुटीच्या अस्तित्वामुळे पाणथळ जागा हे सीआरझेड क्षेत्र आहे आणि त्यामुळे भरतीच्या पाण्याचा प्रवाह अविरत असला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.