पनवेल: पनवेल महापालिका मधील पनवेल, कामोठे, कळंबोली व खारघर या परिसरातून १ मेट्रीक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला असून ५५ हजार रुपयांचा दंड व्यापा-यांकडून वसूल केला आहे. मागील अनेक वर्षात एक मेट्रीक टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची पनवेल महापालिकेची ही पहिलीच वेळ आहे.
शासनाच्या निर्देशानंतर पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी प्लास्टिक पिशव्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश तीन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाला दिले. पालिका उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांनी पालिका क्षेत्रात सिंगल वापर करणा-या प्लास्टिकचा साठा कऱणा-या व्यापा-यांवर लक्ष केंद्रीत कऱण्याच्या सूचना आरोग्य निरिक्षकांना दिल्या. यानूसार खारघर प्रभाग समिती ‘अ ‘ मध्ये ६४० किलो प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना आढळले. या प्लास्टिक पिशवी जप्त करुन त्यांच्याकडून आरोग्य निरीक्षक जितेंद्र मढवी, स्वच्छता निरीक्षक अतुल मोहोकर, संदीप भोईर, अजय ठाकुर, अतिक्रमण विभाग व स्वच्छता दूत यांनी १० हजार रुपये दंड वसूल केला. तसेच प्रभाग समिती ‘ब’ मध्ये आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता निरीक्षक अमोल कांबळे, हरेश कांबळे, अमित जाधव, दिग्नेश भोईर यांनी ९५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
या व्यापा-यांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रभाग समिती ‘क’ कामोठे व ‘ड’ पनवेल शहरामध्ये पालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक योगेश कस्तुरे, ऋषिकेश गायकवाड, अतुल वास्कर, महेंद्र भोईर, धनश्री पीवाल आणि कर्मचा-यांनी २६५ किलो प्लास्टिक जप्त करुन व्यापा-यांकडून 30 हजार रुपये दंड वसूल केला.