पनवेल : मंगळवारी मध्यरात्री नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने पनवेल येथील पळस्पे फाटा येथे इर्टीगा मोटारीची झडती घेतल्यावर १२ लाख २४ हजार रुपये किंमतीचा ६१ किलो २०० ग्रॅम गांजा हा अंमलीपदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत पोलीसांनी मोटारीसह गांजा असा २२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मागील वर्षापासून नवी मुंबई नशामुक्त शहर बनविण्याचा संकल्प पोलीस दलाच्या प्रमुखांनी सोडला असल्याने अंमलीपदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक निरज चौधरी व त्यांच्या पथकाने दिवसरात्र एक करुन कारवाईचा धडाका लावला आहे.
हेही वाचा : आमच्या उमेदवारीची जबाबदारी भाजपची – खासदार बारणे
रसायनी येथून एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी पनवेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी चौधरी यांच्या पथकाला मिळाली होती. या गुप्त माहितीनंतर पोलीसांनी मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे फाटा येथे सापळा रचला. मंगळवारी मध्यरात्री सव्वा एक वाजता पांढऱ्या रंगाची इर्टीगा मोटार संशयितरित्या पळस्पे फाटा येथे आल्यावर पोलीसांनी या मोटारीची झडती घेतली. या मोटारीमध्ये चार पिशव्या होत्या. त्यामध्ये पानेफुले, काड्या, बिया असा ओलसर उग्र वास येणारा गांजा हा अंमलीपदार्थ असल्याची खात्री पोलीसांना पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संशयीत व्यक्तीने हा गांजा कुठून आणला याचा शोध पोलीसांचे पथक लावत आहे.