पनवेल : चिंध्रण गावातील शेतकरी मागील चार दिवसांपासून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत. गुरुवारी या आंदोलकर्त्यांपैकी एका तरुणाची प्रकृती अस्वस्थ झाली. 21 वर्षीय समीर पारधी असे या प्रकृती बिघडलेल्या तरुण उपोषणकर्त्याचे नाव आहे. सरकारी डॉक्टर गेल्या तीन दिवसांपासून या आंदोलकांच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत.
चिंध्रण गावातील ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संस्थेच्या माध्यमातून गावाचे सिमांकन करुन वाढलेल्या लोकवस्तीनुसार गावठाण विस्तार योजना रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गावासाठी राबवावी, तसेच मुंबई उर्जा मार्ग लिमिटेड या वीज प्रकल्पासाठी उच्च दाबाच्या वीज वाहिनीसाठी मनोरे बांधले जात आहेत. अनेक शेतकऱ्यांना या विजेच्या टॉवरमुळे शेतजमीनीवर शेती करता येणार नाही. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी मुंबई उर्जा मार्ग लिमिटेड या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा : मोबाईल चोरीची तक्रार देण्यास गेला… आणि सुखद धक्का बसला… वाचा नेमके काय घडले
सोमवारपासून चिंध्रण गावातील मुख्य चौकात सूरु झालेल्या या आंदोलनाला इतर गावकऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती या गावातील शेतकरी दिलीप पाटील यांनी दिली. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात (नैना) चिंध्रण हे गाव येत असल्याने याच गावातील शेकडो हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तळोजा औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी संपादित केली आहे. रासायनिक प्रकल्प या नव्या विस्तारीत औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवर येणार असल्याने शेत जमिनीसह शेतकऱ्यांना धोका निर्माण होणार असल्याने रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे या उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आल्याची माहिती चिंध्रण गावातील रामचंद्र भागवत यांनी दिली.
हेही वाचा : आदई धबधब्यात पाय घसरून पडल्याने मामा, भाच्याचा मृत्यू
स्वाभिमानी शेतकरी संस्थेचे अध्यक्ष किरण कडू यांनी दिलेल्या माहितीनूसार ७५ वर्षांपासून गावठाण विस्तार योजना चिंध्रण गावासाठी राबविली नसून कुटूंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने गरजेपोटीची घरे गावठाणाबाहेर सुद्धा झाली असल्याने गावचे सीमांकन करुन गरजेपोटी गावठाण आणि गावठाणाबाहेरील घरांना नियमित करण्यासाठी दोन वेळा अर्ज देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने उपोषणाची वेळ ग्रामस्थांवर आल्याचे कडू यांनी सांगितले.