पनवेल: सिडको महामंडळाने शुक्रवारी त्यांच्या संकेतस्थळावर वरिष्ठ नियोजनकार या पदांची भरती प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द केल्याची माहिती जाहीर केली आहे. राज्य सरकारचे आधिवेशन सूरु असताना अचानक भरती प्रक्रिया रद्द केल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी १२ एप्रिलला सिडको मंडळाने वर्ग १ च्या संवर्गातील वरिष्ठ नियोजनकार, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परिवहन अभियंता, अर्थशास्त्र व सहाय्यक विधी अधिकारी अशा ३७ रिक्त पदांकरीता भरतीची प्रक्रिया राबविली होती. यामध्ये वरिष्ठ नियोजनकार या एका पदासाठी भरती केली जाणार होती.
हेही वाचा : अस्वस्थ गणेश नाईक यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
वरिष्ठ नियोजनकार या पदासाठी ७८ हजार ते २ लाख ९ हजार इतके वेतन दिले जाणार होते. तसेच खुला जातीच्या प्रवर्गातून उमेदवारांची निवड केली जाणार होती. वरिष्ठ नियोजनकार या पदा करिता अर्ज केलेल्या उमेदवाराला नगर नियोजन क्षेत्रातील किमान १० वर्षे काम केल्याचा अनुभवासोबत किमान पाच वर्षे असोशिएट नियोजनकार किंवा समकक्ष पदाचा अनुभव गरजेचा असल्याची अट सिडकोने जाहीरातीमध्ये म्हटले होते.