पनवेल : कळंबोली येथून १२ डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह अखेर मंगळवारी सकाळी खारघर येथील ओवेकॅम्प गावाजवळील निर्जनस्थळी सापडला. तरुणी व तिचा प्रियकर १२ डिसेंबरला कळंबोलीतून बेपत्ता झाले होते. तरुणीच्या प्रियकराचा मृतदेह नेरुळ जुईनगर रेल्वेरुळावर सापडला होता. मात्र घरातून बेपत्ता झालेली तरुणी पोलीस व तिच्या नातेवाईकांना सापडली नव्हती. अखेर या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने ही हत्या की आत्महत्या? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा : पनवेल : मालमत्ताधारकांच्या माथी १३६ कोटींचा दंड, चालू आर्थिक वर्षात ३६ कोटी जमा
कळंबोली वसाहतीमध्ये राहणाऱ्या वैभव आणि वैष्णवी यांच्या प्रेम प्रकरणाचा अंत अशा दुर्दैवीपणे झाला आहे. १९ वर्षीय वैष्णवी बाबर आणि २६ वर्षीय वैभव गंगाधर बुरुंगले यांचे प्रेमसंबंध असल्याचे समजते. १२ तारखेपासून हे दोघेही बेपत्ता झाल्याचे समजल्यावर या दोघांच्या नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. या दोघांना खारघर डोंगररांगांच्या दिशेने पाहीले होते. तसेच त्यांना नेरुळ जुईनगर रेल्वेरुळावर पाहण्यात आले होते. नवी मुंबई पोलीसांचे विशेष पथक या दोघांच्या मोबाईल फोनच्या साह्याने तांत्रिक तपास करुन त्यांना शोधत होते. वैभव बेपत्ता झाल्यानंतर काही तासांमध्ये त्याचा मृतदेह सापडला होता. मात्र, वैष्णवीचा शोध लागू शकला नव्हता. वैष्णवीच्या मृतदेहाजवळील वैद्यकीय नमुणे जमा करण्याचे काम पोलीसांचे पथक मंगळवारी सकाळपासून करत होते. वैष्णवीला मारल्यानंतर वैभव रेल्वेरुळापर्यंत गेला का? असा प्रश्न तपास करणाऱ्या पोलीसांना पडला आहे.