पनवेल: सिडको वसाहतींमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याचे पाणी कमी असल्याने गृहनिर्माण संस्थेमधील सदस्यांचे वारंवार आपसात पाणी सोडण्याच्या वेळेवरुन भांडणे होत आहेत. तळोजा वसाहतीमधील फेज १ मधील सेक्टर ९ येथील शंखेश्वर सरदार या गृहनिर्माण संस्थेच्या सचिव आणि एका महिलेचे जोरदार भांडण झाले. या भांडणाची तक्रार अखेर संबंधित महिलेने तळोजा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता शंखेश्वर सोसायटीमधील ३१ वर्षीय महिला सदस्याने शौचालयाला पाणी पाहिजे म्हणून इमारतीच्या रखवालदाराकडे संपर्क साधून पाणी सोडण्याची विनंती केली. मात्र इमारतीमध्ये पाणी सोडण्याची वेळ ठरविली गेली असल्याने या गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाने रखवालदाराला फोनवरुन पाणी सोडू नको असे सांगितले. मात्र त्यानंतर सचिवाने तक्रारदार महिलेला शिविगाळ करुन धमकी दिल्याची तक्रार या महिलेने पोलीसांत नोंदविली आहे.
हेही वाचा : नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय
सिडको महामंडळ तळोजा परिसरात अजून १५ हजार घरे बांधत आहे. अगोदर भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या घरांना सिडको मंडळाने पाणी पुरवावे त्यानंतर नव्या घरांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे सिडकोवासियांची पाणी समस्या सोडविण्यासाठी लवकर काही मार्ग काढतील का याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.