पनवेल : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पारनेर जिल्ह्यातील मूळ रहिवाशांनी कामोठे येथील संवाद सभेसाठी लाखो रुपयांच्या खर्चामुळे ही सभा सर्वात चर्चेत ठरली. डॉ. सुजय यांच्यासाठी कामोठे वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरुन ढोलताशांच्या गाजावाजात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दिड किलोमीटर अंतरावर खुल्या जीपमधून रोडशो करुन डॉ. सुजय यांना संवादसभे ठिकाणी आणण्यात आले. पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक कोंडीत त्यांच्या गळ्यात क्रेनमधून भव्य फुलांचा हार घालण्यात आला. सभेमध्ये प्रत्येक वक्त्याच्या भाषणात फटाक्यांची आतषबाजी, गीतगायनाचा कार्यक्रम आणि सभेनंतर तीन हजार रहिवाशांसाठी जेवण या साऱ्या भव्य नियोजनामुळे सभेचा आर्थिक खर्च अर्थात लाखोंचा होता. जेवढा खर्च डॉ. सुजय यांच्यासाठी आयोजकांनी कामोठे सभेत केला तेवढा खर्च अद्याप मावळ मतदारसंघात दोनवेळा निवडूण आलेल्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी आतापर्यंत कामोठेवासियांसाठी केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या खर्चाचा तपशील निवडणूक आयोग तपासून पाहणार का अशी चर्चा पनवेलमध्ये सूरु आहे.
सायंकाळी पाच वाजता कामोठे येथील नालंदा बुध्द विहार मैदानावर विजुभाऊ औटी मित्र परिवार, कामोठे रहिवाशी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून ही संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. पनवेल शीव महामार्गावरुन कामोठे वसाहतीच्या प्रवेशव्दारावर डॉ. सुजय यांच्या रोडशोला सूरुवात झाली. प्रवेशव्दार ते सभेचे ठिकाण या दिड किलोमीटर लांबीपर्यंत ढोल व ताशा पथकाच्या गाजावाजात रोडशोला सूरुवात झाली. सूमारे चारशे तरुण कार्यकर्त्यांची फौज आणि डॉ. सुजय यांच्या प्रचाराचे फलक घेऊन रोडशो काढल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे दुहेरी रस्त्यापैकी एक रस्ता वाहतूकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला. पोलीस ठाण्यापर्यंत रोडशो आल्यावर डॉ. सुजय यांना क्रेनमधून फुलांचा हार घालण्यात आला. पताके हवेत उडविण्यात आले. नाचतगाजत पारनेर व पाथर्डीचे शेकडो तरुण या रोडशोमध्ये सामिल झाले. पाच वाजता सायंकाळी सूरु होणारी सभा रात्री साडेआठ वाजता सूरु झाली. या सभेसाठी पाथर्डी व पारनेर येथून कार्यकर्ते भरुन वाहने कामोठेत दाखल झाल्याने नालंदा बुध्दविहार मैदान पारनेरवासियांनी भरुन गेले. तीनहजार रहिवाशी बसू शकतील एवढ्या क्षमतेचे मंडप, त्यांच्या पाणीवाटपासाठी चार हजार पाणीबाटली, आणि अडीच हजार खुर्च्या येथे होत्या. कामोठेतील रहिवाशांसाठी गीतगायन आणि नृत्याचा कार्यक्रम आणि डीजीटल स्टेज आणि दोन भव्य डिजीटल स्क्रीन, दोन ड्रोन यासाठी होत्या. स्वता डॉ. सुजय यांनी अशा भव्य मिरवणूक आणि व्यासपीठाचे नियोजन त्यांनी निवडणूक काळात नगर दक्षिण मतदारसंघात केली नसल्याची कबूली दिली. डॉ. सुजय यांच्या प्रचारासाठी हा सर्व खटाटोप आयोजकांनी केल्याने या सभेच्या आयोजनाचा खर्च डॉ. सुजय यांच्या निवडणूक खर्चात निवडणूक आयोग मोजेल का याकडे साऱ्यांचे लक्ष्य आहे.
हेही वाचा : दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
शिवराळ भाषेच्या प्रचारामुळे राजकारणाचा स्तर घसरतोय
रविवारच्या संवाद सभेत आयोजक विजय औटी यांनी डाॅक्टर सुजय विखे यांच्या आईवरील शिवीगाळ आणि डॉ. सुजय यांच्या गोळीबार करण्याच्या शिवराळ भाषेच्या ध्वनीफीत उपस्थित तीन हजार रहिवाशांना एेकविल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला. मात्र डॉ. सुजय यांनी त्यांच्या भाषणात दहशत कीती आहे हे समजण्यासाठी ही ध्वनीफीत एेकविण्यासाठी ते कामोठेत आल्याचे सांगून उपस्थितांना धक्का दिला. विकासाच्या मुद्यावर लढणारे डॉ. सुजय यांचा मोर्चा दहशतीच्या मुद्याकडे वळल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. निवडणूकीच्या प्रचारसभेत आतापर्यंत पनवेलच्या राजकीय कुटूंबियांनी कधीच शिवराळ भाषेचा जाहीर प्रयोग केला नसल्याने राजकारणाचा स्तर घसरलाय अशी चर्चा होती.