पनवेल: तळोजा वसाहतीमधील फेज २ मधील शेकडो वीज ग्राहकांना अखंडीत वीज समस्येला तोंड द्यावे लागल्याने निवडणूकीची आचारसंहिता सूरु असताना नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. १० जून रोजी वीजग्राहक आंदोलन करण्यापूर्वी बुधवारी वीज महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी तळोजा येथील उपकेंद्रात वीजग्राहकांसोबत यासंदर्भात घेतलेल्या बैठकीमध्ये लवकरच वीज खंडीत समस्या उद्भवू नये यासाठी कामे हाती घेतलयाचे आश्वासन दिले. तसेच विजेबाबत विविध समस्येवर महावितरण लवकरच तोडगा काढेल असेही या बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी पुकारलेले आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा : नवी मुंबई : रस्त्यावर भिक्षा मागण्यासाठी हप्ता देण्यास नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर जीवघेणा हल्ला
मागील चार महिन्यांपासून वारंवार तळोजा फेज दोनमधील वीज गायब होत असल्याने येथील नागरिकांना गावखेड्यात राहत असल्याचा अनुभव मिळाला. वाढीव वीज देयक कमी करण्यासाठी वीजग्राहकांना वसाहतीमध्येच सोय करावी अशी मागणी ग्राहकांची होती. महावितरण कंपनीचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता देवीदास बैयकर यांनी वसाहतीमध्ये ८ नवीन रोहीत्र बसविण्याचे काम सूरु असल्याचे नागरिकांच्या बैठकीत सांगीतले. तसेच वीजवाहिनी अतिरीक्त असावी यासाठी दूसरी वीज वाहिनी वसाहतीमध्ये टाकण्यात येणार असून तातडीने वीजदेयकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक कार्यालयात सोय करण्याची प्रक्रीया महावितरण कंपनी लवकर करेल असेही आश्वासन अतिरीक्त अभियंता बैयकर यांनी दिले. नागरिकांनी महावितऱण कंपनीच्या आश्वासनानंतर तुर्तसा आंदोलन मागे घेतले असे या बैठकीत जाहीर केले.