पनवेल : पनवेल शीव महामार्गावरील खारघर येथील ‘हायवे ब्रेक’ या हॉटेलला रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये हॉटेलचे फर्निचर आणि सजावट खाक झाले. मात्र हॉटेल बंद असल्याने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. खारघर अग्निशमन दलाच्या बंबाने दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. खारघर येथील हायवे ब्रेक या हॉटेलला रविवारी रात्री एक वाजून ४० मिनिटांनी आग लागल्याचे समजताच काही मिनिटांत येथे खारघर येथील सिडको महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग नियंत्रणासाठी धाव घेतली. हे हॉटेल पनवेल शीव महामार्गाला खेटून असल्याने कोपरा गावातील आणि खारघर वसाहतीमधील रहिवासी घटनास्थळी जमा झाले. हॉटेल बंद झाल्याने तातडीने हॉटेलच्या कर्मचारी व व्यवस्थापनाने हॉटेल उघडून अग्निशमन दलाच्या जवानांना आत प्रवेश करण्यासाठी वाट करुन दिली. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण हाॅटेल खाक झाले होते.
हेही वाचा : सानपाडा दत्त मंदिर संरक्षक भिंतीचे काम सुरू
यापूर्वी २०१९ मध्ये सुद्धा याच हॉटेलला आग लागली होती. त्यावेळेस अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला अग्निसूरक्षा यंत्रणा लावण्याची आणि हॉटेलमधील पोटमाळ्यातून आपत्तीवेळी बाहेर पडण्यासाठी वेगळा दरवाजा काढण्याची सूचना केली होती. मात्र हॉटेल व्यवस्थापनाने सूरक्षा यंत्रणा लावली आणि दरवाजा सुद्धा स्वतंत्र काढला मात्र तरीही रविवारी पुन्हा याच हॉटेलला आग लागली. नेमकी आग का लागली याचे कारण अद्याप अग्निशमन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना समजू शकले नाही. मात्र हॉटेलमध्ये हवा मोकळी नसणे, काचांच्या आणि आग झपाट्याने लागणाऱ्या वस्तूंचा सजावटीमध्ये अतिवापर केल्याने आगीच्या लोटांनी काही मिनिटांमध्ये हॉटेल खाक केले.