पनवेल : मुंबई उर्जा प्रकल्पाचे पनवेल येथे सुरू असणारे काम कोणत्याही परिस्थितीत थांबवले जाणार नाही, यावर कंपनीचे संचालक ठाम आहेत. या दरम्यान शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रक काढून मुंबई उर्जा कंपनीचे काही अधिकारी व सरकारचे काही अधिकारी पाटील यांची बदनामी करत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई उर्जा कंपनीचे संचालक निनाद पितळे यांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभोडे आणि वळवली या परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरुन वीजेचे टॉवर जातात त्यामध्ये एक स्वतः बाळाराम पाटील हे प्रकल्पबाधित असून त्यांना साडेपाच कोटी रुपयांची नूकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगीतले होते.

मात्र बुधवारी माजी आ. पाटील यांनी अशा कोणत्याही नूकसान भरपाईबद्दल आजपर्यंत पनवेलचे उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके आणि मुंबई उर्जा कंपनीचे अधिकारी निनाद पितळे यांच्यासोबत कधीच चर्चा झाली नाही. तसेच नुकसान भरपाईसंदर्भात कोणतीही बैठक उपविभागीय कार्यालयात पार पडली नाही. निव्वळ सामान्य शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने माजी आ. पाटील यांची बदनामी करण्यासाठी मुंबई उर्जा कंपनी आणि काही सरकारी अधिकारी असे खोडसाळ प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. लोकसत्ताने याबाबत दोन दिवसांपूर्वी मुंबई उर्जा प्रकल्पाच्या कामावरुन शेतकरी विरुद्ध कंपनी असा संघर्ष पेटणार असे वृत्त दिले होते. वेळीच याबाबत मुंबई उर्जा कंपनीने खुलासा न केल्यास त्यांच्याविरोधात अब्रु नूकसानीचा दावा करणार असल्याचे माजी आ. पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : उरणचे दिबांच्या नावाचे अभियांत्रिकी महाविद्यालय रखडले; बारा वर्षांपासून मदतीच्या प्रतीक्षेत

३७ आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल

मुंबई उर्जा प्रकल्पाच्या कामाला विरोध करणाऱ्यांसाठी शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांच्यासह ३७ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभोडे येथे मुंबई उर्जा प्रकल्पाअंतर्गत वीजेचे टॉवर उभारण्याचे काम सुरू असून जमिनीची नूकसान भरपाईमध्ये शेतकऱ्यांची संमती नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या निश्चित केलेल्या दराविरोधात शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. चार दिवसांपूर्वी आंदोलन सुरू असताना बाळाराम पाटील यांच्यासह शिवसेनेचे बबन पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दुपारी पावणेएक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेंभोडे गावासमोरील रस्ता रोखल्याने खांदेश्वर पोलीसांनी फौजदारी गुन्हा नोंदविला आहे.