पनवेल : तालुक्यातील चिंध्रण गावातून तळोजा मजकूर गावात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता घोट गावाजवळील भोईरवाडा येथे घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तीन आसनी रिक्षा थांबवली. प्रवासी महिलेला काही समजण्याआतच चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि बोरमाळ हिसकावून तेथून धूम ठोकली. यावेळी महिलेसोबत तीचे पती होते.
हेही वाचा : ‘एपीएमसी’मधील कचरा विल्हेवाटीत आता जागेचा तिढा; पालिकेचे सिडकोकडे बोट
एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी या घटनेत लुटले आहेत. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यापूर्वीही मुंब्रा पनवेल महामार्गावर रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी लुटले होते. अद्याप दुचाकीवरील हे चोरटे पोलीसांना सापडू शकले नाहीत. या घटनेतील पीडित महिला ४० वर्षीय असून त्या तळोजा मजकूर गावात राहत आहेत. चोरट्यांची दुकली मराठी भाषेतून बोलणारी होती. त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते. दोघांचे वय २० ते २५ दरम्यान असल्याचे महिलेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.