पनवेल : पनवेल-मुंबई या हार्बर मार्गावरील लोकलचा प्रवास मागील अनेक दिवसांपासून मंदावला आहे. नवीन रेल्वेरुळ टाकल्याने पहिल्याएवढीच गती दिल्यास अपघात होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने सध्या गती कमी ठेवली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे. यापूर्वी प्रती तास ३० या वेगाने मुंबईकडे जाणारी रेल्वे धावत होती. नवे रुळ असल्याने सध्या प्रती तास १५ या वेगाने लोकल धावत आहे. लोकलची गती मंदावल्याने दिवसाला ३६२ लोकलची ये-जा यापूर्वी स्थानकात सुरु होती, परंतू फलाट संख्या पुरेशी नसल्याने लोकल स्थानकापासून लांब उभी करावी लागत असल्याने प्रवाशांची बोंबाबोंब होऊ नये यासाठी लोकलची संख्या कमी करण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळी याचपद्धतीने ठाणे मार्गावर धावणारी ट्रान्सहार्बर अचानक पनवेल ते बेलापूर या दरम्यान कोणतेही कारण न देता बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांनी सकाळी कामाचे ठिकाण गाठण्यासाठी बसने प्रवास केला तर अनेकांनी तीन आसनी रिक्षातून प्रवास केला. मीटर प्रमाणे रिक्षाभाडे आकारले जात नसल्याने प्रवाशांची पनवेल स्थानकाबाहेर लुट पाहायला मिळाली. पनवेल रेल्वेस्थानकात दररोज ३२ हजारांहून अधिक प्रवासी लोकलने मुंबई व ठाणे या दिशेने प्रवास करतात. दिवसाला २२ ते २४ लाख रुपये तिकीटातून रेल्वे मंडळाला उत्पन्न मिळते. परंतू मागील अनेक दिवसांपासून लोकल अचानक रद्द होणे, लोकलला फलाट न मिळाल्याने लोकल स्थानकापासून काही दूर फलाट मिळण्याच्या प्रतिक्षेत उभी राहणे, एका फलाटावर पुकारा झाला असताना अचानक दूसऱ्या फलाटावर लोकल येणे असे अनेक प्रकार होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

हेही वाचा : उरणच्या शेतजमिनीवर दलालांचा डोळा, शिवडी-न्हावाशेवा पूल, नव्या रेल्वेमुळे जमीन विक्रीला जोर

पनवेल रेल्वेस्थानकात लोकल थांबण्याची फलाट संख्या मागील काही दिवसांपासून कमी करण्यात आली आहे. पहिले चार वेगवेगळे फलाट स्थानकांमध्ये होते. यामधील ४ क्रमांकाचा फलाट बंद ठेवण्यात आला आहे. तसेच तीन क्रमांकाच्या फलाटावरील एकच बाजू वापरात आहे. यापूर्वी चार फलाटांवर थांबणाऱ्या लोकल गाड्या सध्या तीन फलाटांवर थांबतात. फलाट संख्या कमी असल्याने अनेकदा लोकल स्थानकापासून काही अंतरावर फलाट रिकामी होईपर्यंत उभी करावी लागत असल्याने प्रवाशांना ताटकळत रेल्वेतच बसून रहावे लागते. अनेकदा प्रवासी रुळावरुन चालून स्थानक परिसर किंवा नजीकचा महामार्ग गाठतात. रेल्वे मंडळाच्या या गोंधळाच्या कारभारामुळे मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रवासी संख्या कमी झाली आहे.

हेही वाचा : पनवेल रेल्वेस्थानकात रिक्षाचालकांची मुजोरी सूरुच

लोकलच्या प्रवाशांनी राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसचा आणि नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेचा (एनएमएमटी) बसचा पर्याय निवडला. दररोज ३६२ लोकलची ये-जा असणाऱ्या लोकलपैकी नेमक्या किती लोकलगाड्या कमी केल्या आहेत. याची माहिती पनवेल रेल्वे प्रशासनाकडे नसल्याचे येथील स्थानिक रेल्वे प्रशासनाने सांगीतले. पनवेल रेल्वे स्थानक हे जंक्शन होत आहे. पनवेल ते मुंबई, पनवेल ठाणे या मार्गासोबत दिवसाला दिवा पनवेल या लोहमार्गावरुन ३२ हून अधिक एक्सप्रेस गाड्यांची ये-जा स्थानकात असते. या व्यतिरीक्त मालगाड्यांची वाहतूक दिवा पनवेल मार्गावरुन सूरु असते. नवीन पनवेल ते कर्जत या मार्गासाठी रेल्वे रुळाचे काम लवकरच सूरु होणार आहे.

हेही वाचा : उरण मध्ये समाधानकारक पाऊस; भात पिकांच्या उत्पादनात होणार वाढ

डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या रुळ टाकण्याचे काम सध्या स्थानकालगत सूरु आहे. यामुळे मालवाहू गाड्यांना थेट जेएनपीटी बंदरामध्ये जाता येणार आहे. परंतू पनवेल स्थानकाच्या विस्तारामध्ये सर्वाधिक जटील प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसनाचा असल्याने मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या कुष्टरोगांसाठीच्या झोपडपट्टीधारकांना रेल्वे प्रशासनाने कल्याण येथे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच रेल्वे रुळांलगत इतर झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. अनेक वर्षे झोपडपट्टीत वास्तव्य केलेल्या झोपडीधारकांचे रोजगार पनवेलमध्ये आणि घर कल्याण येथे यामुळे या प्रस्तावाला विरोध झाला. पनवेलमध्येच घर मिळाल्यास हा प्रश्न मार्गी लागून पनवेल स्थानाकाचा विस्तार होईल. यामुळे स्थानकात अजून नवा फलाट निर्माण होऊ शकेल. केंद्र सरकारचे प्रतिनिधी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी या पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Story img Loader