गोळीबाराच्या घटनांनंतर बंदूकधाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी
शस्त्र परवान्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सुरक्षा विभागाकडे अर्ज करावा लागतो. पोलिसांकडून अर्जदाराचे चारित्र्य पडताळले जाते. अर्जदाराचा सरकारी रुग्णालयातून वैद्यकीय अहवाल मागविला जातो, तसेच खोपोली आणि ठाणे येथे शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण पत्र आवश्यक असते. हे प्रशिक्षण दहा दिवस ते एका महिन्यापर्यंतचे आहे. संबंधित व्यक्ती उद्योजक, व्यापारी असल्याने त्याची आयकरचे विवरण, शिक्षणाचा दाखला व इतर सरकारी ओळखपत्र जमा केल्यानंतर परवाना मिळतो. उद्योजकांना रोख रकमेचा व्यवहार करताना स्वसंरक्षणासाठी हे परवाने दिले जातात. सध्या जर्मन बनावटीच्या पिस्तुलांना मागणी आहे. दोन ते दहा लाख रुपयांपर्यंत पिस्तूल विकत घेणारे शस्त्रधारक जास्त आहेत.
स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणाऱ्यांची पनवेल तालुक्यातील संख्या ६५० आहे. अशा शस्त्र परवानाधारकांची पोलीस दफ्तरी नोंद आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत स्वत:कडील शस्त्राचा गैरवापर केल्याच्या दोन घटना घडल्या असल्या तरी पोलिसांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंदूकधाऱ्यांची कसून तपासणी हाती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तालुक्याचा विचार करता पनवेल शहरात शस्त्र परवानाधारकांची संख्या जास्त आहे. नवीन पनवेल यात दुसऱ्या क्रमांकांवर आहे.
शस्त्र परवानाधारकांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खांदेश्वर आणि खारघर वसाहत आहे. तळोजा पोलीस ठाण्यात ५० शस्त्र परवानाधारकांची नोंद झाली आहे. तर खालोखाल कामोठे आणि कळंबोली वसाहतीचा क्रमांक लागतो, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
२३ फेब्रुवारी २०१४ रोजी विकास घरत या बांधकाम व्यावसायिक तरुणाने कामोठे येथे रात्रीच्या क्रिकेट सामन्यांमध्ये केलेल्या गोळीबाराची घटना आणि कळंबोलीमध्ये गेल्या वर्षी २२ सप्टेंबरला गणेशोत्सवात पत्त्यांच्या जुगारातील वादामुळे भालसिंग बल याने केलेला गोळीबार या दोन घटनांमुळे पोलीस सावध झाले आहेत.
चार वर्षांपूर्वी पनवेलमध्ये राहणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याने क्रिकेट सामने पाहताना एका ढाब्यावर गोळीबार केल्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. अनेक उद्योजकांनी स्वत:ला धमकीचे पत्र आल्याचे सांगून अदखलपात्र गुन्ह्य़ांची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करून हे शस्त्र परवाने पदरात पाडून घेतले आहेत.
पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवाने बंद केल्यानंतर हे परवाना मिळविण्यासाठी शक्कली लढविल्या गेल्या आहेत. इतर राज्यांतून शस्त्र परवाने घेऊन नंतर नवी मुंबईत स्थायिक होत असल्याचे दाखवत शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविण्याची शक्कल काहीजण लढवत असल्याची माहिती पोलिसांनी या वेळी दिली.
पनवेलमध्ये ६५० शस्त्रधारी
शस्त्र परवान्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सुरक्षा विभागाकडे अर्ज करावा लागतो.
Written by संतोष सावंत
Updated:
First published on: 22-01-2016 at 00:43 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel has 650 armed holder