पनवेल : कळंबोली येथील पोलाद बाजारामध्ये शंभराहून अधिक भंगार व्यावसायिकांच्या दुकानात दुचाकी, मोटारींसह अवजड वाहनांच्या इंजिनासह सुटे भाग रस्त्यावर बेकायदा विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हा बेकायदा व्यवसाय तेजीत सुरू असून याकडे पोलीस प्रशासन, आरटीओकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलाद बाजारामध्ये २० वेगवेगळ्या गाळ्यांमध्ये वाहने कापण्याचे आणि वाहने कापल्यानंतर मिळालेले सुटे भाग १०० गाळ्यांच्या समोरील रस्त्यावर खुलेआम भंगारविक्री करण्याचा बेकायदा व्यवसाय तेजीत सुरू आहे. विशेष म्हणजे पोलाद बाजारात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आहे. या कार्यालयामध्ये १५ हून अधिक अधिकारी काम करतात. मात्र आरटीओच्या अधिकाऱ्यांना बेकायदा वाहनांची इंजिन विक्री दिसूनही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : इन्स्टाग्रामवर आमिष दाखवून २८ लाखांची फसवणूक

नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने बसच्या तपासणीतून दोन राज्यांत एकाच बसची नोंदणी असल्याचे प्रकरण उघड केले. असे असताना वाहनांच्या सुट्या भागांच्या बेकायदा विक्रीबाबत पनवेल आरटीओच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी याबाबत तपासणी करण्याचे अधिकार शासनाने दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कळंबोलीतील वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या मंडळींनी याच नियमाचा आधार घेऊन ही दुकाने थाटली आहेत. शंभराहून अधिक भंगार व्यावसायिकांकडे वाहनांचे सुटे भाग आले कुठून याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्त्यावर बेकायदा इंजिन व चेसिस क्रमांकांची चौकशी आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन पोलिसांनी केल्यास असंख्य वाहनचोरीच्या प्रकरणांना वाचा फुटू शकेल. हजारो वाहने कालबाह्य झाल्याने आरटीओकडे कर न भरताच वाहनमालक ही वाहने भंगारात विक्री करतात. मात्र हा सर्व कारभार बेकायदा चालतो. यावर अंकुश ठेवल्यास आरटीओचा बुडालेला महसूल वसूल होण्यास मदत मिळेल.

हेही वाचा : शेती वाचविण्यासाठी निधीची गरज, हजारो एकर जमिनीच्या सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

सुटे भाग खरेदीसाठी गर्दी, लाखोंची उलाढाल

सध्या वाहतूक व्यवसायिकांसाठी कळंबोलीतील लोखंड बाजारामध्ये मिळणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांमुळे खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. दररोज लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल या बाजारात होते. शासनाने लोखंड व पोलाद खरेदी विक्रीसाठी बाजाराची निर्मिती केली असली तरी सध्या या बाजारात निम्या किमतीमध्ये वाहनाचे सुटे भाग मिळण्यासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे.त्याच ठिकाणी सुटेभाग खरेदी करून बाजारातील गॅरेजमध्ये ते वाहनामध्ये लावायचे आणि वाहन दुरुस्त करुन घेण्यासाठी लोखंड बाजार ओळखला जात आहे.

वाहनचोरीची प्रकरणे

नवी मुंबईतून २०२१ आणि २०२२ या वर्षांत १९८९ वाहने चोरीस गेली. यंदाच्या वर्षाची वाहने चोरींची संख्या अद्याप पोलिसांनी जाहीर केली नाही. १९८९ पैकी अवघे ६२५ वाहनांचा शोध पोलिसांना लागला. उर्वरित १३६४ वाहने गेली कुठे हे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा : वडील रिक्षाचालक, आई गजरे विकते; मुलाने परदेशात मिळवली पीएचडी, उरणच्या सागर अडतरावची यशोगाथा

“आरटीओच्या कक्षेत स्पेअरपार्टच्या दुकानातील सुटे भाग तपासण्याचे काम अद्याप तरी आलेले नाही. त्यामुळे लोखंड बाजारातील वाहनाच्या सुटे भाग तपासण्याचे काम झाले नाही. तसेच अद्याप जिल्हा पातळीवर स्क्रॅप धोरण जाहीर असले तरी त्या धोरणाची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर झाली नाही.” – गजानन ठोंबरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल