पनवेल : सिडकोच्या महत्त्वाकांक्षी महागृहनिर्माण प्रकल्पांपैकी उलवे येथील उन्नती गृहप्रकल्पाचा नामोल्लेख केला जातो. मात्र मागील महिन्याभरापासून या गृहप्रकल्पातील हजारो रहिवासी पिण्याचे पाणी अपुरे मिळत असल्याने हैराण झाले आहेत. उन्नती प्रकल्पामध्ये ४२ टॉवर्समध्ये १३४४ सदनिका आहेत. बहुचर्चित गृहप्रकल्पांची घोषणा करून प्रत्यक्षात प्रकल्पांना आवश्यक सोयीसुविधा न देण्याचे प्रकार सिडकोकडून होत असल्याने सिडकोच्या प्रकल्पांवर सिडकोचीच खप्पामर्जी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. उलवे येथील गृहप्रकल्पाला १००० हजार युनिट पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडकोचे अधिकारी लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन देतात. प्रत्यक्षात मात्र पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. स्थानिक राजकारणाची पाठराखण करताना सिडकोतील काही अधिकारी त्या त्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मर्जी सांभाळण्यासाठी आता पाण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप होतो आहे. उन्नती प्रकल्पाकडे खाजगी गृहसंकुलाच्या तुलनेत विजेच्या भारनियमनाबरोबरच आता कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याचाही सामना करावा लागत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: तळोजा येथील केम्सपॅक कंपनीला भीषण आग

सातत्याने नवनवीन प्रकल्पांच्या घोषणेत मग्न असलेले सिडको प्रशासन अखत्यारीत असलेल्या गृहसंकुल प्रकल्पांना कुणाची मर्जी राखण्यासाठी डावलत आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकीकडे सर्वत्र पाणी पातळी खालावत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र कोणतीही कपात लागू होण्यापूर्वीच अघोषित पाणीबाणी सहन करावी लागत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काही क्षेत्रात सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या हटवादी भूमिकेचा नाहक फटका सदनिकाधारकांना बसत आहे. आम्ही आमचे पाणी सोडण्याचे काम करतो, अशी तोंडदेखली उत्तरे देतात.

हेही वाचा : उरणच्या नव्या तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव, ५३ कोटींच्या निधीची शासनाकडे मागणी

पाण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ

खारघरसारख्या वसाहतीमध्ये ८ ते ९ हजार रुपये चौरस फुटांना सदनिका खरेदी केलेल्या रहिवाशांना पाण्यासाठी मोर्चे काढावे लागतात. अशीच वेळ करंजाडे नोडमधील नागरिकांवर आली आहे. मागील महिन्यापासून हीच वेळ उलवे येथील उन्नती गृहप्रकल्पातील रहिवाशांवर आली आहे. उन्नती प्रकल्पात सिडकोने पाणीपुरवठ्यासाठी जोडलेले मीटर हे पाच फुटांच्या खाली बसविल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दुसरा पाण्याचा कोणताही पर्याय नसल्याने रहिवाशांना पाण्यासाठी अनेक संकटे पार करावी लागत आहेत.

हेही वाचा : उरण : जागतिक पर्यटनस्थळ घारापुरी टंचाईग्रस्त, बेटावर बोटीने पाणीपुरवठ्याची मागणी

“नुकतीच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर याबद्दल बैठक झाली. पाणीपुरवठा करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पाणीपुरवठा पूर्ववत होईल याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.” – उत्तम चिकणे, चेअरमन, उन्नती सोसायटी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel inadequate water supply to unnati society of cidco housing project css