पनवेल : शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत पनवेलमध्ये १२१.६७ मिलीमीटर पाऊस पडल्याने समुद्रसपाटीपेक्षा खोल वसविलेल्या कळंबोली वसाहतीमध्ये पाऊस बंद होऊन चार तास उलटले तरी दोन फूट पाणी तुंबलेलेच राहील्याने वसाहतीमध्ये पूरसदृष्यस्थितीचा सामना नागरिकांनी केला. कळंबोलीतील सेक्टर २ ते १० या परिसरातील तळमजल्यावरील घरांना सर्वाधिक फटका बसला. केएल १, एलआयजी या बैठ्या वस्तीसोबत ए आणि बी टाईप इमारतीच्या तळमजल्यावरील घरांमधील नागरिकांची तारांबळ उडाली होती. पाऊस बंद होऊनही रस्त्यावरील पाणी ओसरत नसल्याने नागरिक चिंतेत होते. दरम्यान दुपारी सव्वा एक वाजल्यापासून समुद्राला पुन्हा भरती सुरू झाल्याने महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे मोटार पंप सुरू असूनही वसाहतीमध्ये दोन फुट पाण्याखाली रस्ते गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाऊस बंद झाल्यानंतरही कळंबोलीतील रस्त्यावरील पाणी कमी न झाल्याने रस्त्याला नदीच्या पाटाचे रुप आले होते. पनवेल महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनाचे काम रविवारी सकाळपासून पालिका क्षेत्रात सर्वत्र हाती घेतले. महापालिका क्षेत्रात सर्वत्र तुंबलेले पाणी धारणतलावात तसेच लोकवस्तीपासून दूर फेकण्यासाठी पालिकेने ७० मोटारपंप लावले होते. त्यापैकी २७ मोटारपंप हे एकट्या कळंबोली वसाहतीमध्ये लावल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली. कळंबोलीतील तुंबलेले पाणी काढण्यासाठी तसेच इतर सफाईच्या कामासाठी पालिकेने रविवार सुट्टी असतानाही कळंबोलीतील साडेतीनशे कर्मचारी तैनात केल्याचे उपायुक्त कैलास गावडे म्हणाले. पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्याने ही स्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता. कासाडी नदीपात्रालगत रोडपाली परिसरातील फूडलॅंड कंपनीलगतच्या वाड्यावर ६० रहिवाशांना नदीची धोक्याची पातळी गाठण्यापूर्वी रोडपाली येथी बुद्धविहारात सूरक्षित ठिकाणी पालिकेने स्थलांतरीत केले. तसेच पटेल मोहल्ला येथील ज्या कुटूंबांना पुराचा धोका आहे अशा १६० नागरिकांना पालिकेने उर्दु शाळेत स्थलांतरीत करण्यात आले.

हेही वाचा : उरण: चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी, वर्षा पर्यटनसाठी निसर्गरम्य स्थळांवर पर्यटकांची पावले

पालिकेने पनवेलच्या उर्दु शाळेत तसेच रोडपाली येथील बुध्द विहारामध्ये स्थलांतरीत केलेल्या नागरिकांसाठी जेवण व राहण्याची सोय केली होती. उर्दु शाळेत वैद्यकीय सेवेसाठी एक डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पालिकेने उपलब्ध केले होते. रात्री पावसामुळे अशीच स्थिती राहील्यास स्थलांतरीत नागरिकांसाठी जेवणासह चादर देण्याची सोय पालिका करणार असल्याचे पालिका उपायुक्त कैलास गावडे यांनी सांगीतले. कळंबोली वसाहतीमधील वीज दुपारी १२ वाजल्यानंतर गायब झाल्याने नागरिकांनी विज वितरण कंपनीच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. पडघे गावाच्या प्रवेशव्दारावरील पुलावर कासाडी नदीचे पाणी वाहु लागल्याने महापालिकेने या पुलावरील वाहतूक सकाळी बंद केली होती. परंतू दुपारनंतर पाणी पुलाखाली गेल्यावर पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. पडघे गावातील एक तीन आसनी रिक्षा पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेल्याने रस्त्याकडेला घरात राहणारे रहिवाशी चिंतेत होते. पालिकेची जलवाहिनीचा काही भाग पाण्याच्या ओढ्यात वाहून गेल्याने रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालिकेचे कर्मचारी काम करत होते. सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा पुर्ववत होईल असे पालिका उपायुक्त कैलास गावडे यांनी सांगीतले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel kalamboli under two feet of water 27 motor pumps and 350 personnel working to remove water css