पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी नियमबाह्य कोणताही व्यवसाय नवी मुंबईतून चालू देणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर राज्याच्या गृहविभागाच्या प्रधान सचिवांनी अशा नियमबाह्य धंद्यांविरोधात तोच पवित्रा घेतल्याने पनवेल येथील क्रेझी बॉईस या लेडीज सर्व्हीसबारचा परवाना रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईतील लेडीज ऑर्केस्ट्रा आणि सर्व्हीस बारच्या नावाखाली डान्सबार चालविणा-या व्यवसायिकांना हा सर्वात मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सर्वाधिक लेडीज ऑर्केस्ट्रा आणि सर्व्हीस बार चालतात. रात्री उशीरापर्यंत चालणा-या या बारमध्ये महिला वेटर नृत्य करुन पैशांची उधळन केली जाते. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना नियमबाह्य कृती करणा-या बार व्यवस्थापनाविरोधात सक्तीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरी ही नवी मुंबईतील बार संस्कृतीला वेसन घालण्यात पोलीस असमर्थ ठरले. यामुळे आयुक्तांनी या बारवर अंकुश राहण्यासाठी वेगवेगळ्या हद्दीतील पोलीसांचे पथकांव्दारे कारवाईचे सत्र सूरु केले.
हेही वाचा…Maratha Aarakshan Morcha : मराठा मोर्चेकरी हळूहळू नवी मुंबईत दाखल, ५०० पेक्षा अधिक लोकांनी केले जेवण
मागील वर्षी २६ ऑगस्टला विविध लेडीज सर्व्हीसबारमधील तपासणी सूरु असताना पनवेलचे क्रेझी बॉईस या बारमध्ये तपासणी दरम्यान या बारच्या परवान्यामधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलीसांना निदर्शनास आल्यामुळे या बारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर करण्यात आला. पोलीस आयुक्त भारंबे यांनी याबाबत बारचे व्यवस्थापकासमोर सुनावणी घेतल्यानंतर व्यवस्थापनाकडून अटींचे उल्लंघन झाल्याची खात्री झाली. त्यामुळे आयुक्तांनी क्रेझी बॉईस या ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश मागील वर्षी ३० ऑक्टोबरला दिले.
संबंधित परवाना धारकांनी या आदेशाविरोधात शासनाकडे अपील केल्यानंतर राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिवांनी ५ जानेवारीला सुनावणी घेतली. प्रधान सचिवांनी १९ जानेवारीला संबंधित बारचे परवाना धारकाचे अपिल फेटाळत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी मागील वर्षी ३० ऑक्टोबरला क्रेझी बॉईज रेस्टॉरंट अॅन्ड बार आस्थापनेचा ऑर्केस्ट्रा परवाना रद्दचे आदेश कायम ठेवण्यात आल्याचा निर्णय दिला. याबाबत नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी यापुढे सुध्दा नवी मुंबईत बार आस्थापनांनमध्ये होणा-या नियमांच्या उल्लंघना बाबत कडक कारवाई पोलीस पथकांकडून सूरु ठेवली जाणार असल्याची माहिती दिली.
आर. आर. पाटील हे राज्याचे गृहमंत्री पदी असताना त्यांनी नियमबाह्य पद्धतीने लेडीज बार सूरु असणा-या संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि त्या परिमंडळाच्या उपायुक्तांवर दोषी धरुन त्यांच्यावर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी पनवेलमध्ये कपल बारमध्ये अल्पवयीन मुलींना घेऊन वेश्या व्यवसाय आणि जुगाराचा गैरधंदा एका सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्यानंतर चालत असल्याची माहिती उच्चपदस्थ पोलीस अधिका-यांना मिळाली. या उच्चपदस्थ पोलीस अधिका-यांनी स्थानिक पोलीसांना अंधारात ठेऊन संबंधित बारवर धाड टाकली. या प्रकरणानंतर पनवेलच्या एका वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना घरी बसावे लागले. तर उपायुक्तांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. सध्या नवी मुंबई व पनवेलमधील गैरधंद्यांविरोधात नवी मुंबई पोलीस आयुक्त व त्यांचे खास पथक एकटेच लढा देत असल्याचे चित्र आहे.