पनवेल: लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सूरु असल्याने अनेक सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांच्या सरकारी कारवाईत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होत नसल्याने कारवाई रितसर करणे सोपे होते. पनवेल तालुक्यातील वावंजा गावात वीजचोरीचे मोठे प्रकरण वीज महावितरण कंपनीच्या वाशी येथील भरारी पथकाने उघडकीस आणले आहे. विज विभागाचे सहाय्यक अभियंता कपिल गाठले यांनी बुधवारी दुपारी पावणे एकवाजता पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार वावंजा गावातील परेश पाटील व त्यांच्या पत्नीने ३० हजारांपेक्षा जास्तीच्या वीज युनिटची चोरी केल्याची तक्रार पोलीसांना दिली. परेश पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे पनवेल ग्रामीणचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. महावितरण कंपनीच्या तक्रारीनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात परेश पाटील व त्यांच्या पत्नीविरोधात वीजचोरी केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा : पनवेल : प्रेमजाळ्यात महिलेला अडकवून ३० लाखांची फसवणूक
पाटील दाम्पत्य वावंजे गावात राहत असून त्यांनी मागील अनेक महिन्यांपासून वीजचोरी केल्याचे उजेडात आले आहे. वावंजा गावातील घर क्रमांक १४२२ येथे पाटील दाम्पत्य राहत असून ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२४ या दरम्यान १९ महिन्यांमध्ये ३०,८२२३ वीज युनिटची चोरी केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आल्याने परेश पाटील व त्यांच्या पत्नीविरोधात १० लाख २५ हजार ९२२ रुपयांची वीज चोरी केल्याबाबत भारतीय विद्युत कायदा कलम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता कपिल गाठले यांनी तक्रार दिल्यावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हा गुन्हा पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र घेवडेकर यांनी दिली. परेश पाटील हे तत्कालिन पनवेल पंचायत समितीचे सदस्य होते. शेकाप व शिवसेनेच्या युतीमध्ये त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली होती. सध्या ते शिंदे गटाच्या शिवसेनेचे ग्रामीण पनवेलचे पदाधिकारी असून श्रीरंग बारणे यांच्यासाठी ते गावोगावी प्रचारसभेत शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडत आहेत. विशेष म्हणजे वावंजा गावात यापूर्वीही वीजचोरी होत असताना सुद्धा महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी पकडले आहे.