पनवेल : पनवेल तालुका आणि उपनगरातर्फे कळंबोली येथील करावली चौकात एकाच ठिकाणी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सूरुवात झाली असून या आंदोलनात मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या महिलांसह मुस्लिम महिलांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, शेकापचे माजी नगरसेवक गणेश कडू, अमोल शितोळे, मनसेचे नितीन काळे यांच्यासह सामान्य मराठा बांधव उपस्थित होते. या आंदोलनाला पहिल्या दिवशी सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांनी हजेरी न लावल्याची चर्चा होती. २४ तासांमध्ये पाचशेहून अधिक मराठा व इतर जाती धर्माच्या रहिवाशांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला.
हेही वाचा : पनवेल : कामोठे येथील अक्षर इमारतीमध्ये आग
रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहाराने वंदन करुन आंदोलनाची सूरुवात झाली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आणि मनोज जरांगे पाटील समर्थनार्थ सूरु केलेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांच्या मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देणार नाही घेतल्या शिवाय राहत नाही. अशा घोषणा यावेळी कऱण्यात आल्या. कळंबोलीसह, कामोठे, पनवेल शहर, नवीन पनवेल आणि खांदेश्वर आणि खारघर उपनगरातील मराठा बांधव येथे एकत्र आले होते. दिवसरात्र सूरु असणाऱ्या आंदोलनात दररोज साखळी उपोषणाला बसणाऱ्यांची नावे नोंदविली गेली आहेत. या नावांची यादी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहेत.
हेही वाचा : अतिक्रमण पथकाविरोधात ऐन दिवाळीत बाजार बंद; फेरीवाले मोकाट, कारवाई मात्र व्यावसायिकांवर
बेरोजगार, शिक्षण घेणारे, नोकरी व धंदा करणारे तसेच काही गृहिणींनी या आंदोलनात आपली उपस्थिती नोंदविली. ज्या व्यक्तीला जसा वेळ मिळेल तसे स्वत:चे योगदान द्यावे, असे आवाहन सकल मराठा बांधवांनी केले. कळंबोलीतील रत्नमाला शिंदे या मराठा महिलेने उपोषणात सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत त्यांच्या मैत्रिण अपसरी फिरोज मोमिन यांनी दिवसभर उपोषणस्थळी आंदोलनात सहभाग नोंदविला. मराठा समाज व मुस्लीम समाज बंधूभाऊ असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. अपसरी यांच्या पाठिंब्यामुळे उपोषणाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. साखळी उपोषणकर्ते संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनूसार साखळी उपोषणात १० ते २० जण उपस्थित दिसणार आहेत. सामान्यांचे हे आंदोलन असल्याने उपोषणकर्त्यांची कमी नसून शांततेत आणि जरांगे पाटील यांचे सूरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन करत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.