पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेना हलक्या वाहनांना टोल नाक्यावर सूट मिळावी यासाठी पनवेलमध्ये आक्रमक झाली आहे. सोमवारी दुपारी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शेडुंग टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अचानक आलेल्या मनसे कार्यकर्त्यांमुळे टोल नाक्यावरील कर्मचारी गोंधळले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अगोदर पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली, मात्र त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी शेडूंग टोल नाक्यावर धडक देत हलक्या वाहनांना सूट मिळावी यासाठी आंदोलन हाती घेतले.

हेही वाचा : बृहन्मुंबई पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कारभार स्वयंविकास पॅनेलकडे

काही वेळाने तिथे बंदोबस्तासाठी पोलीस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलीसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मनसेचे पनवेल जिल्हा अध्यक्ष योगेश चिले यांनी या संपूर्ण घटनाक्रमावर माहिती देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आम्ही सैनिक आहोत, दोन दिवसांत हलक्या वाहनांसाठी टोल नाके बंद केले नाहीत तर राज्य सरकार विरोधात याहून तीव्र आंदोलन करू असे सांगितले.