पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचे पायी चालून आंदोलन करणा-यांना पोलीसांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर रोखले. अजूनही आंदोलन सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत रस्त्यावर महिला व लहान बालकांसोबत सेवा रस्त्यालगत बसले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या इतर संघटनांनी त्यांना तोंडी पाठिंबा दिला असला तरी आंदोलकांची संख्या कमी होती. आंदोलक कमी संख्येने असल्याने पोलीसांनी आंदोलकांना पुढे जाण्यास मज्जाव केल्याचे दिसले. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी ज्या शेतक-यांनी जमिन दिली त्या शेतक-यांचे हाल अद्याप संपलेले नाहीत. पावसातही शेतकरी कुटूंबासोबत न्यायाच्या प्रतिक्षेत रस्त्यावर आंदोलन करीत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या ही प्रमुख मागणी या शेतक-यांची आहे. त्याचसोबत या प्रकल्पात बाधित झालेल्या मासेमार कुटूंबियांना २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे पुनर्वसनासाठी नूकसान भरपाई द्यावी, ज्या घरांचा सिडकोने सर्वेक्षण केले आहे. अशा बांधकामांना शुन्य पात्रता दिल्याने अशा मालमत्तांना सरसकट नूकसान भरपाईचे पॅकेज द्या, तलावपाली, चिंचपाडा येथील घरमालकांना एक पट भूखंड दिले आहेत. त्या बाधित प्रकल्पग्रस्तांना तीप्पट भूखंड आर्थिक नूकसान भरपाई द्यावी, बाधित १० गावांतील तरुणांना रोजगार प्रशिक्षण देणे, प्रकल्पग्रस्तांमधील १८ वर्षांवरील मुलामुलींना विमानतळबाधित दाखला देऊन येथे व्यवसाय करण्यासाठी येणा-या कंपनीसोबत सिडकोने विमानतळबाधितांच्या नोक-यांसंदर्भात करार करावा, वाघिवली गावातील प्रकल्पग्रस्तांच्या तातडीने घरांचा ताबा द्यावा, विमानतळ प्रकल्पासाठी वाघिवली गावक-यांची घरे तोडली मात्र त्यांना अद्याप भूखंड द्यावेत व नूकसान भरपाईचे घरभाडे द्यावे व इतर प्रमुख मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले आहेत. दुपारी तीनवाजेपर्यंत पोलीसांनी पायी मोर्चा काढणा-यांना करंजाडे पुलावर थांबविल्यावर मोर्चेक-यांना रस्त्यावर बसून आंदोलन करण्याची भूमिका घेतली.

हेही वाचा : खारघरमध्ये ५२ लाख रुपयांची घरफोडी

हे आंदोलक मुंबई येथील मंत्रालयात पायी जाणार होती. पोलीसांनी आंदोलकांना दिलेल्या प्रस्तावानूसार आंदोलकांचे एक शिष्टमंडळ वाटाघाटीसाठी पुढे जाऊयात आणि आंदोलकांना घरी पाठवा असा पोलीसांचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून रस्त्यावर पावसातच आंदोलन सूरु केले. या आंदोलनात उरण व पनवेलचे कोणतेही लोकप्रतिनिधी दिसले नाहीत.आखिल भारतीय किसान सभा सलग्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने या आंदोलनाचे नेतृत्व केले. या कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, रामचंद्र म्हात्रे, सचिव संजय ठाकूर, विशाल भोईर, किरण केणी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलकांनी यामध्ये सहभाग घेतला.