पनवेल : मैत्रिणीसोबत पालकांना न सांगता फिरायला गेल्यामुळे आईवडील ओरडतील या भितीने एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने ३० फूट उंच उड्डाणपुलावरुन खाडीत रविवारी सकाळी साडेदहा वाजता उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तळोजा वसाहतीमध्ये राहणारी ही विद्यार्थीनी सध्या रुग्णालयात उपचार घेत असून सुखरुप आहे. तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित विद्यार्थीनीच्या पालकांनी शनिवारी त्यांची १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ही विद्यार्थीनी शनिवारी रात्री ३ वाजता घराबाहेर गेली ती पहाटे घरी परत आली.
हेही वाचा : नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची हत्या, पत्नी आणि वाहन चालक आरोपी, वाहन चालकास अटक
पहाटे घरी परतल्यावर या मुलीची आई तीला ओरडली. पुन्हा सकाळी वडील ओरडतील या भितीने ही मुलगी घराबाहेर पडली. याबाबत आई वडीलांनी शोधाशोध केल्यानंतर तीचा शोध लागला नाही. या पालकांनी तळोजा पोलीसांत धाव घेतली. तोपर्यंत काही नागरिकांना ही मुलगी तळोजा फेज १ व २ या दोन्ही वसाहतींना जोडणाऱ्या पुलावर दिसली. येथे नागरिक जमा होण्यास सुरूवात झाली. पोलीससुद्धा काही वेळेत तेथे पोहचले. मात्र तोपर्यंत भितीपोटी या मुलीने खाडीत उडी मारली. खाडीत पाणी व दगड असल्याने तीला जखमा झाल्या. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात या मुलीवर उपचार झाल्यावर ती सुखरूप असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.