पनवेल : पनवेल तालुक्यातील कुष्ठरोग निवारण आणि कुष्ठरुग्ण बांधवांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या ‘कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन’ या संस्थेच्या विश्वस्त मिरा लाड यांची वयाच्या ९२ व्या वर्षी सोमवारी सायंकाळी शांतीवन आश्रमात प्राणज्योत मालवली. त्या काही महिने आजारी होत्या. शांतीवन संस्था मोठी होण्यामध्ये लाड यांचा मोठा हातभार होता. मरणोत्तर देहदान करण्याची त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे सोमवारी त्यांचा देह कामोठे येथील महात्मा गांधी रुग्णालयात दान करण्यात आला.

मुंबईतील शाळेत शिक्षिका म्हणून त्या काम करत होत्या. मीरा लाड यांनी राष्ट्र सेवा दलाचे नाथ पै यांच्यासोबत काम केले होते. त्यांना ‘राजीव’ (मुलगा) व ‘रजन’ (मुलगी) ही दोन अपत्ये होती. दोघांनाही चांगले शिक्षण दिल्यानंतर अचानक राजीव व रजन या दोघांचेही निधन झाले. या धक्यातून त्या खंबीरपणे सावरल्यानंतर लाड यांनी मुलांच्या आठवणीसाठी ‘राजीव-रजन लाड ट्रस्ट’ची स्थापना केली. लाड यांनी शिक्षिकेच्या नोकरीवरुन स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर वेतन व भत्ते तसेच त्यांची संपत्ती या ट्रस्टमध्ये गुंतवली.

हेही वाचा : खारघरमध्ये राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह, देशभरातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग

त्यानंतर त्यांनी पनवेल जवळील ‘शांतीवन’ या संस्थेमध्ये कामाला सूरुवात केली. कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन या संस्थेसाठी त्यांनी आपले सर्वस्व वाहिले. या संस्थेतील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रम, स्नेहलता निसर्गोपचार केंद्र, श्री.अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आश्रमशाळा, विणकाम आदी सर्व विभागात फक्त पदाधिकारीच नाही तर सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले.

Story img Loader