पनवेल: शीव पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल येथे शनिवारी सकाळी तेलाची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने महामार्गावर सर्वत्र तेल पसरले. अनेक दुचाकी पसरलेल्या तेलावरुन गेल्याने महामार्गावर घसरल्या. तातडीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या दरम्यान कळंबोली सर्कल येथील सर्वच महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तेल महामार्गावर पसरल्याने काही काळासाठी मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित महामार्ग फोमने धुवून काढल्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली. परंतू महामार्ग फोमने धुतल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात फोम आणि पाणी साचले होते. वाहतूक पोलीस वाहतूक नियमनासाठी येथे तैनात असले तरी शनिवार असल्याने मुंबई पूणे द्रुतगती महामार्ग, मुंब्रा पनवेल महामार्ग यावरील वाहतूक सकाळी काही काळ ठप्प होती.
हेही वाचा : नवी मुंबई: बांधकाम व्यावसायिकाने उभारलेल्या बेकायदा झोपड्यांवर कारवाई
तरुणीचा अपघाती मृत्यू
महामार्ग फोमने धुवून काढल्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली. या दरम्यान वाहतूक कोंडीतून पनवेलच्या दिशेने निघणारी वाहने खांदेश्वर उड्डाणपुलाच्या अलिकडे जात असताना १९ वर्षीय राजनंदिनी रमेश जाधव या दुचाकीस्वार तरुणीचा महाविद्यालयात जात असताना अपघाती मृत्यू झाला. राजनंदिनी चालवित असलेल्या दुचाकीच्या चाकांना महामार्गावरील तेल लागल्याने तीची दुचाकी उलटल्याची चर्चा होती. राजनंदिनी हीची दुचाकी उलटल्यानंतर तीच्या मेंदूला मार लागला. तीच्या डोक्यात हेल्मेट नव्हते. त्यामुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने तीचा मृत्यू झाला. राजनंदिनी चालवित असलेली दुचाकी नेमकी कशामुळे उलटली याचा शोध खांदेश्वर पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली.