पनवेल : तालुक्यातील आदई धबधब्यावर पाय निसटून सूकापूर येथे राहणाऱ्या मामा, भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमध्ये प्रदीप कामी (वय ७ वर्ष) आणि पारस बाकी (वय ३५ वर्ष) या मामा भाच्याचा मृत्यू झाला आहे. पोलीसांनी वर्षासहलीवर धबधब्यांवर जाण्यास मनाई केली असतानासुद्धा सूकापूर गावात राहणारे बाकी आणि कामी कुटूंबिय वर्षासहलीसाठी बुधवारी दुपारी धबधब्यावर गेले होते. यामध्ये सूरुवातीला धबधब्याच्या उंच कड्यावर प्रदीप गेला, मात्र तो अडकल्याचे समजल्यावर त्याचा मामा पारस हा त्याला वाचवण्यासाठी गेला. परंतू पाय निसटून दोघेही खाली कोसळले.
हेही वाचा : मोबाईल चोरीची तक्रार देण्यास गेला… आणि सुखद धक्का बसला… वाचा नेमके काय घडले
हेही वाचा : उरण : खारकोपर लोकलवरील गव्हाण स्थानक अपूर्णच; काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागणार
पोलीस, ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांना जखमी अवस्थेत रात्री उशीरा कसेबसे बाहेर काढल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली. वैद्यकीय उपचारांपुर्वीच या घटनेतील मामा भाच्यांचा मृत्यू झाला होता. खांदेश्वर पोलीसांनी वर्षासहलीसाठी धबधब्यांवर जाण्यास मनाई असल्याचे फलक लावले आहेत. तेथे पोलीस बंदोबस्तही आहे. मात्र पोलीसांना चकवा देत नागरिक तेथे वर्षासहलीसाठी जात आहेत. वन विभागाला येथे वनरक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.