पनवेल : करंजाडे वसाहतीमधील टाटा पॉवर हाऊस असलेल्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता दोन गटात प्रचंड हाणामारी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तेथे पोलीसही पोहचले. मात्र हाणामारी करणाऱ्यांपैकी काहींनी पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच मद्यपी जमावाने अजून एका नागरिकाला बेदम मारहाण केली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गोंधळ माजवून हाणामारी केल्या प्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता एका जागरुक नागरिकाने पोलीसांना फोन करुन टाटा पॉवर हाऊस लगत दोन गटात हाणामारी सुरु असल्याची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी काही मिनिटांत पोहचले.

हेही वाचा…हवाई दलाच्या प्रवेश निषिद्ध परिसरात प्रवेश केल्याने गुन्हा दाखल

३२ वर्षीय उद्धव सोळंके हे पोलीस जमावातील काही तरुणाला शांत करत असताना दोन गटातील तरुणांनी उद्धव यांनाच धक्काबुक्की केली. तसेच अजून एका नागरिकाला मारहाण केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादवि ३५३ प्रमाणे तसेच भादवी ३३२, ३२४, १४३, १४५, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३), १३५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. १८ संशयीत आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी शोधून सी.आर.पी.सी. ४१ अ १ प्रमाणे नोटीस बजावली असून उर्वरीत संशयीतांचा शोध सुरु आहे.