पनवेल: कळंबोली येथील स्मशानभूमीत मागील चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने शनिवारी (ता. ८ जून) सुदर्शन कासले (वय ५३) यांच्या अंत्यविधीला मोठी अडचण निर्माण झाली. कासले यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीत जाऊन तयारी केली, परंतु स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नव्हती. पाणी नसल्याने अंत्यविधी कसा करावा असा प्रश्न पडल्याने कासले यांच्या नातेवाईकांनी पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्या आणून त्याव्दारे अंत्यविधी आटपला. पनवेल महापालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा हा नमुणा असून या संतापजनक घटनेनंतर कळंबोलीवासियांनी पनवेल महापालिकेच्या कारभाराविषयी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा: नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित
स्मशानभूमीत वारसाला अंगावर पाणी घेतल्याशिवाय अंत्यविधी पार पाडता येत नाही. अंत्यविधीनंतर वारसाला आंघोळीसाठी आणि नातेवाईकांना हातपाय धुण्यासाठी पाणी लागते. परंतू मागील चार दिवसांपासून या स्मशानभूमीत पाण्याची वाहिनीतून काहीच पाणी पुरवठा झाला नसल्याचे स्मशानभूमीतील रखवालदारांनी सांगीतले. पनवेल महापालिका नागरिकांकडून करवसूलीसाठी विविध उपाययोजना राबवित आहे. परंतू नागरिकांना महापालिकेकडून दिल्या जाणा-या सेवा व सुविधा पुरविण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या कळंबोली स्मशानभूमीत पालिकेने विविध बांधकामे हाती घेतली आहेत. या दरम्यान स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणा-यांंनी थांबावे कुठे यासाठी पालिकेने कोणती सोय केली नाही.
हेही वाचा : नेटवर टास्क पूर्ण करण्याचे काम करत आहात? सावधान! नवी मुंबईतील एकाची तब्बल साडे अठरा लाख रुपयांची फसवणूक
पनवेल पालिकेचे प्रभाग अधिकारी व पालिका उपायुक्तांनी या स्मशानभूमीत फेरी मारल्यास त्यांना नागरिकांची होणारी गैरसोय नजरेस पडेल. यापूर्वी पाणी पुरवठा स्मशानभूमीत सूरळीत होता. मात्र काही रिक्षाचालक व दुचाकी स्मशानभूमीच्या पाण्यावर धुण्याचे उद्योग येथे चालतात. पालिकेने एका खासगी ठेकेदाराकडून अंत्यविधीचे साहीत्य विक्रीसाठी ठेवल्याचे दिसते. हे अंत्यविधीचे मोक्ष कीट साडेतीन हजार रुपयांत ठेकेदार विक्री करतो. मात्र या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाणी उपलब्ध नसल्याची पाटी स्मशानभूमीत कुठेही लिहून ठेवल्याची दिसत नाही. अंत्यविधीसाठी आवश्यक असणारे पाणी मिळू न शकल्याने पनवेल महापालिकेचे नवनियुक्ती आयुक्त मंगेश चितळे या प्रकरणी लक्ष घालून उपाययोजना करतील अशी अपेक्षा आहे. शनिवारी कासले यांच्या नातेवाईकांनी पिण्याच्या बाटलीबंद पाण्याचे दोन पेट्या स्मशानभूमीत आणल्यानंतर अंत्यविधी पार पडला.