पनवेल: रहाण्यायोग्य वसाहत अशी जाहिरात केली जात असलेल्या खारघर वसाहतमधील सेक्टर ३४ आणि ३५ मधील रहिवाशांना पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहे. पावसाळ्यातही या परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायटी टॅंकरचे पाणी खरेदी करुन पीत आहेत. मागील तीन महिन्यात सव्वा लाख रुपयांचे टॅंकरचे देयक सेक्टर ३४ मधील सोसायट्यांमधील रहिवाशांनी अदा केले आहेत. या उलट सिडको महामंडळाचे पाणी पुरवठा विभाग रहिवाशांच्या मागणीनुसार गृहनिर्माण संस्थांना पाण्याचा प्रति टॅंकर ११० रुपयांना पुरवठा करत असल्याचा दावा करत आहे. सिडको नागरिकांच्या पाणी समस्येसाठी सर्तक असेल तर रहिवाशांना लाखो रुपये खर्च का करावे लागतात असा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. पावसाळ्यात रहिवाशांचे हाल होत असल्याने कॉंग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खारघर वसाहतीला ८० दश लक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सिडको महामंडळ वसाहतीला कमी पाणी पुरवठा करत असल्याने पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अनियमित सूरु आहे. पावसाळ्यात पाणी समस्या मिटेल अशी अपेक्षा खारघरवासियांना होती. मात्र या स्थितीत काहीही बदल झाला नसल्याचे रहिवाशी सांगतात. सूजाता इंप्रेस, चौरंग सिद्धी गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना पाणी टंचाई पावसाळ्यात तिव्र जाणवत असल्याने नागरिकांना खासगी टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
हेही वाचा… मोरा – मुंबई जलप्रवासासाठी प्रवाशांना पार करावी लागते अडथळ्यांची शर्यत
सिडको मंडळाचे खारघर विभागासाठी नेमलेले पाणी पुरवठा अधिका-यांनी यावर प्रतिक्रीया दिली नाही. मागील अनेक दिवसांपासून पावसाळा असला तरी सिडको वसाहतींमध्ये पाणी समस्या आहे. सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि रहिवाशांच्या प्रश्नांना टाळत असल्याचे चित्र आहे.
सेक्टर ३४ आणि ३५ मधील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये पावसाळ्यातही भिषण पाणी टंचाईची स्थिती आहे. सिडको मंडळाकडून मिळणारे पाणी कमी दाबाने आणि काहीच तासच पुरते. त्यामुळे रहिवाशांना गृहनिर्माण संस्थांना लाखो रुपये खर्च करुन टॅंकरने पाणी खरेदी करावे लागते. जर सिडकोने पाणी प्रश्न सोडवला नाही तर कॉंग्रेस आंदोलन करणार. टोलच्या प्रश्नावर पक्ष बदलणारे आमदार पाण्याच्या संदर्भात भूमिका मांडतील की नाही. – डॉ. स्वप्नील पवार, उपाध्यक्ष, कॉंग्रेस पक्ष