उरण : लोकसभा निवडणुकीत ठाणे व मावळ लोकसभा मतदारसंघातील बहुसंख्य असलेल्या आगरी मतांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा देत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून जोगवा मागितला जात आहे. सोमवारी खारघर येथील प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीसंदर्भात दिबांच्या नावाची घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे. तर ठाणे मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे व मावळमधील उमेदवार संजोग वाघिरे पाटील यांनीसुद्धा याच मागणीचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे पुन: एकदा विमानतळाला दिबांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महायुतीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा ठरवा रद्द करीत वर्षभरापूर्वी दिबांचे नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा ठराव घेऊन केंद्रीय विमान उड्डान मंत्री यांच्याकडे पाठविला आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ठराव पारित करण्यात आला आला. मात्र हा ठराव केंद्राकडे मंजुरीसाठी पडून आहे. या ठरावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अन्यथा नामकरण समितीच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा समितीने दिला आहे. तर दिबांच्या चिरंजीवांनी भाजपच्या प्रचार मेळाव्यात भाजपा नाव देईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा : नवी मुंबईत ८० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

आंदोलन करूनही केंद्राचे दुर्लक्ष

१२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटलसेतू, नेरुळ-उरण लोकल, नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम विमानतळाच्या जागेत झाला. मात्र त्यावेळी पंतप्रधानांनी दिबांचा साधा उल्लेखही न केल्याने आगरी समाजाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी स्वत: केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पत्रकार परिषद घेत नामकरणाचा निर्णय हे पंतप्रधान घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे नामकरणासंदर्भात आगरी समाजाकडून शंका व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अटलसेतू पूर्ण होण्यापूर्वी त्याच्या नावाला मंजुरी मिळाली मात्र नामकरणासाठी दोन वर्षे आंदोलन करूनही केंद्र सरकारने साधी घोषणाही केलेली नाही.

Story img Loader