नवी मुंबई: वाशीच्या एपीएमसी बाजारात यंदा कडधान्य आणि डाळींची आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात चवळी, मूग, मुगडाळ, तूरडाळ आणि मटकीच्या दरात प्रतिकिलो १० रुपयांनी वाढ झाली आहे.
श्रावण महिन्यांपासून सणांना सुरुवात झाली आहे. तसेच भाजीपाला महाग होत असल्याने गृहिणी डाळींकडे मोर्चा वळवितात. विशेषतः चवळी, हरभरा, तूर,मूग, उडीद डाळीला अधिक पसंती दिली जाते. सध्या एपीएमसी घाऊक बाजारात कडधान्य आणि डाळींची आवक घटली आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि कडक उष्णतेमुळे कडधान्य आणि डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आवक कमी आहे.
परिणामी मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दरवाढ झाली आहे. एपीएमसीत जूनमध्ये चवळी २९३क्विंटल तर आता जुलैत २३८ क्विंटल दाखल झाली आहे, प्रतिकिलो ६८-११०रुपये दर आहेत तेच मागील महिन्यात प्रतिकिलो ६५-१०० रुपयांनी विक्री होत होती. तर मटकी जूनमध्ये २८६ क्विंटल तर आता १०६क्विंटल दाखल होत आहे, दरात १५ रुपयांनी वाढ झाली असून आधी ८०-१२०रुपये किलोने उपलब्ध असलेली मटकी आता ८०-१३५ रुपयांवर गेली आहे. मुगडाळ आवक कमी आहे.
हेही वाचा… उरण : पूर ओसरल्यावर आता चिरनेरमध्ये सापांचा धोका , नागरीकांमध्ये भितीचे वातावरण
जूनमध्ये २५२१क्विंटल तर आता १३२६क्विंटल दाखल झाली आहे. त्यामुळे १० रुपयांनी वाढ झाली असून ९०-१२० रुपयांवरून ९०-१३०रुपयांनी विक्री होत आहे. तर मागील महिन्यात २३९८क्विंटल तूरडाळ आवक झाली होती, या महिन्यात ३४०५क्विंटल आवक झाली असली तरी प्रतिकिलो ८५-१२५रुपयांवरून ९५-१३५रुपयांनी विक्री होत आहे.
कडधान्य – जून दर – जुलै दर
चवळी – ६५-१०० ६८-११०
मटकी – ८०-१२० ८०-१३५
मूग – ८५-१२० ८५-१२५
मुगडाळ – ९०-१२० ९०-१३०
तूर डाळ – ८५-१२५ ९५-१३५