नवी मुंबई: एपीएमसी बाजारात सध्या पावसामुळे लसणाची आवक कमी होत असून त्यामुळे दर वधारत आहेत. दिवसेंदिवस दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या घाऊक बाजारात प्रतिकिलो उटी लसूण १३०-१६० रुपये व देशी लसूण ११५-१२५ रुपये आणि किरकोळ बाजारात १८०-२०० रुपयांवर पोहचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला लसणाचे दर आवाक्यात असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. परंतु एप्रिलपासून आवक कमी झाल्याने भाव वधारण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात किरकोळ बाजारात लसूण ५० तर ८० रुपये इतके होते. मात्र एप्रिल महिन्यापासून लसणाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या घाऊक बाजारातच लसूण दिडशेरुपयांवर गेले असून, उटी लसूण १३०-१६०रुपये व देशी लसूण ११५-१२५ रुपयांनी विक्री होत आहे, तर किरकोळ दर २०० रुपयांवर गेला आहे.

हेही वाचा… उरण: रानसई धरणाच्या जलवाहिनीला गळती

घाऊक बाजारात मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश ,आणि गुजरात मधून लसणाची आवक होत असते. बाजारात हंगामात सरासरी १५ ते २० गाड्या लसणाची आवक होते. मात्र मंगळवारी बाजारात अवघ्या ८ गाड्या दाखल झाल्या आहेत. १ हजार २१९ क्विंटल लसूण आवक झाली आहे. यंदा लसणाचे उत्पादन कमी आहे.

हेही वाचा… उरण: जेएनपीटी विद्यालयात विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे प्रवेशद्वार बंद आंदोलन

पावसामुळे लसूण उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी होत आहे. दोन वर्षांपूर्वी लसूण लागवडी खालील क्षेत्र कमी असल्याने उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे लसणाचे दर गगनाला भिडले होते. दोन वर्षांपूर्वी २०० ते २५० रुपयांनी लसूण विकला जात होता. पुन्हा यंदा तीच परिस्थिती ओढावली आहे. मागील वर्षी जुलैमध्ये लसूण ४०-८०रुपयांना उपलब्ध होते. मात्र यावेळी पुन्हा दोन वर्षांपूर्वीची परिस्थिती उद्भवली आहे. पुढील कालावधीत दर आणखीन कडाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील आठवड्यात उटी लसूण प्रतिकिलो १२०-१५० रुपये तर देशी लसूण १००-१०५रुपयांवर होता. तेच मंगळवारी उटी लसूण १३०-१६० रुपये आणि देशी लसूण ११५-१२५रुपयांनी विक्री होत आहे.

कांदा-बटाट्याच्या दरात देखील वाढ

एपीएमसीमध्ये कांदा बटाट्याची आवक कमी होत आहे. त्याचबरोबर पावसाने भिजलेला शेतमाल दाखल होत आहे. त्यामुळे कांदा बटाट्याच्या दरातही दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारी कांद्याच्या ८७ गाड्या तर बटाट्याच्या ३६ गाड्या दाखल झाल्या आहेत. कांदा प्रतिकिलो १४-१५ रुपयांवरून १७-१८ रुपयांवर वधारला आहे, तर बटाटा ९-१२रुपयांवरून १२-१४ रुपयांना विक्री होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the navi mumbai apmc market due to rains the arrival of garlic is decreasing and prices are increasing dvr