उरण : मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईसह सर्व मार्गांवरील कंटेनर वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने बंदरातून निर्यातीसाठी जाणारी आठ मालवाहू जहाजे बारा तास अडकली होती. त्यामुळे या आंदोलनाचा फटका येथील जेएनपीए बंदरालाही बसला आहे. वाहतूक विभागाने पळस्पे-पनवेल या ठिकाणाहून टी पॉईंट येथून गव्हाण टाकी मार्गाने पाम बीच येथून वाशी येथील मुक्कामी जाणार असल्याने पदयात्रेला अडथळा आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून गुरुवारी (२५) सकाळपासूनच जेएनपीटी एनएच -४ बी या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जेएनपीटी एनएच -४ बी या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्यामुळे जेएनपीए बंदर परिसरातील विविध रस्त्यांवरील कंटेनर मालाची वाहतूक रोखून ठेवण्यात आली होती. यामुळे जेएनपीए बंदरापर्यंत निर्यात मालाची कंटेनर वाहने वेळेत न पोहचल्याने निर्यात मालाचे कंटेनर जहाजात चढविण्यातही १२ तासांहून अधिक विलंब झाला. या विलंबामुळे मात्र आठ मालवाहू जहाजेही बंदरातच खोळंबून राहिली होती.
हेही वाचा : उरणमध्ये एनएमएमटीच्या ब्रेक डाऊन होणाऱ्या बसची संख्या वाढली, भर रस्त्यात बस बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त
बंदरातील निर्यात मालाची ने-आण प्रक्रिया काही काळ थांबल्यामुळे बंदरातील कामकाजावर परिणाम झाला होता. मात्र शनिवारपासून बंदरातील आयात -निर्यात मालवाहू जहाजांची हालचाल सुरळीतपणे सुरू झाली असल्याची माहिती जेएनपीएचे वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक गिरीश थॉमस यांनी दिली. वाहतूक खोळंबल्याने बंदरात येणाऱ्या-जाणाऱ्या कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मात्र बंदरावरील वाहतुकीचा ताणही वाढणार आहे, अशी माहिती जेएनपीएचे कामगार विश्वस्त रवींद्र पाटील यांनी दिली.