उरण : तालुक्यातील चिरनेर येथील एका शेतकऱ्याच्या शेताच्या तळ्यावर आलेल्या सात फुटी अजगराला सर्प मित्रांनी जीवदान दिले आहे. हा अजगर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. चिरनेरमध्ये भक्षाच्या शोधात आलेला सात फुटी अजगर जाळ्यात अडकून पडला असल्याची माहिती फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत ठाकूर, त्यांची कन्या सृष्टी ठाकूर व त्यांचे सहकारी गौरव वशेणीकर यांना मिळताच, त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या सोबत घटनास्थळ गाठले. आणि सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी या अजगराची सोडवणूक करून त्याला जीवदान दिले.
हा अजगर रात्रीच्यावेळी भक्षाच्या शोधात आला असावा, मात्र शिकार करण्याआधीच, तो जेरबंद झाल्याने, जाळ्यात निपचित पडला होता. मात्र सर्पमित्र जयवंत ठाकूर आणि त्यांची कन्या सृष्टी ठाकूर यांनी त्या अजगराची सुखरूप सुटका केली. या घटनेची माहिती तात्काळ उरण तालुका वनविभागाला देण्यात आली.त्यानंतर वनखात्याचे भाऊसाहेब डिविलकर, वनरक्षक संतोष इंगोले,राजेंद्र पवार यांनी या जखमी अजगराला उपचाराच्या व संवर्धनाच्या दृष्टीने ताब्यात घेतले. आणि उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यूअर्सच्या उपचार केंद्रात दाखल करण्यासाठी नेले आहे.