उरण : भूमिपुत्रांचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांनी लढून मिळविलेल्या जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडांचा ताबा मार्च २०२४ पर्यंत देण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र मार्च महिन्याच्या मध्यावरही भूखंडावर मातीचा भराव आणि रस्ते गटारांची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे भूखंड ताब्याची मार्चची तारीखही हुकणार असल्याचे चित्र आहे. यामुळे जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी मात्र सिडको आणि जेएनपीए प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडकोने जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडांचा मार्च २०२४ ला प्रत्यक्ष ताबा देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र भूखंडावरील विकासकामे सुरूच न झाल्याने अपूर्ण कामामुळे मार्च पर्यंत ताबा मिळणार का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. भूखंड वाटपांत दिरंगाई होत असल्याने जेएनपीटी साडेबारा टक्के धारक शेतकरी मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा…शासकीय आस्थापनांनी आचारसंहिता लागू झाल्याने नवी मुंबई, पनवेल मधील ठिकठिकाणचे फलक हटविले

उरण-पनवेल मार्गावरील दास्तान ते करळ दरम्यानच्या अतिशय मोक्याच्या भूखंडांवर जेएनपीटी मधील शेतकऱ्यांना हे भूखंड मिळणार आहेत. सध्या उरण हे लोकल आणि अटल सेतूमुळे मुंबईचे उपनगर बनले आहे. त्यामुळे या भूखंडांना अधिकचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

जेएनपीटी साडेबारा टक्केच्या प्रस्तावित भूखंडावर सध्या भूखंड आरक्षणाचे फलक झळकले आहेत. मात्र भूखंडांचा विकास अपूर्ण आहे. त्यामुळे भूखंडांचा विकास कधी असा सवाल आता जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे.

सिडको व जेएनपीटी प्रशासनाने संयुक्त बैठकीत दसऱ्यापर्यंत जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडांची निश्चिती करून भूखंडांवर नामफलक लावण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र या भूखंडांवरील काम अपूर्ण होते. त्यामुळे दसऱ्याचा मुहूर्त सारल्यानंतर आता जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या दास्तान ते करळ दरम्यानच्या भराव करण्यात आलेल्या भूखंडांवर आता सिडकोने भूखंड आरक्षणाचे फलक लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

हेही वाचा…पनवेल: तरुणीला बनावट अश्लील छायाचित्र पाठवले, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

प्रकल्पग्रस्तांच्या रेट्यामुळे साडेबारा टक्के भूखंड वाटपाच्या प्रकियेला वेग आला आहे. यातील प्रकल्पग्रस्तांची कागदपत्रे सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष भूखंड वाटप म्हणून आखणी करून प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचे नाव व क्रमांक टाकून दसऱ्याच्या मुहूर्तावर भूखंड निश्चित करण्याचे आश्वासन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी दिले होते. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होतांना दिसत नाही. या संदर्भात सिडकोच्या मुख्य भूमी व भूमापन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran anger mounts as cidco fails to deliver promised plots to jnpt project victims by march 2024 psg