उरण : गुरुवारी साडेबारा वाजताच्या सुमारास जेएनपीए बंदराच्या दिशेला जाणारा फाॅसफरस असलेला कंटेनर उलटला असून अग्निशमन दल आणि पोलिसांच्या सहाय्याने कंटेनर हटविण्याचे काम सुरू आहे. हा कंटेनर रस्त्यात उलटल्यानंतर शेजारून जाणाऱ्या एका वाहनावर कोसळण्याची शक्यता होती. मात्र वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली. जेएनपीए बंदराच्या पाचही बंदरात दररोज वीस हजारा पेक्षा अधिक वाहने ये-जा करीत आहेत. त्याचप्रमाणे कामगार कर्मचारीही याच मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे कंटेनर उलटल्याने बंदरात जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता.
हेही वाचा : नवी मुंबई : सूर्यास्तानंतर बांधकामांना बंदी, बांधकामांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी अखेर नियमावली
जेएनपीए बंदरात जाणाऱ्या मार्गावरील पीयुबी येथील उड्डाणपूला खाली हा कंटेनर उलटला आहे. कच्च्या खताचे रसायन या कंटेनर मध्ये असल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे. मात्र खबरदारी म्हणून अग्निशमन दलाच्या मदतीने कंटेनर मधील रसायन काढून रिकामा करण्यात येणार आहे.