उरण : शिकायची इच्छा असेल तर आर्थिक कमतरता किंवा गरिबी अडथळा होऊ शकत नाही, मदतीसाठी समाजही मागे नसतो हे उरणच्या डॉ. सागर अडतराव याच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. वडील रिक्षाचालक तर आई गजरे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी, त्यामुळे अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सागर अडतराव या उरणच्या बोरी येथे राहणाऱ्या बुद्धिमान मुलाने नेदरलँड मधून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळविली आहे. लहानपणापासूनच बुद्धिमान असलेला सागर वर्गात नेहमीच पहिला यायचा. हा क्रम त्याने हा दहावी आणि बारावीमध्ये तालुक्यात प्रथम येत राखला. त्याला डॉक्टर व्हायचे होते. मात्र उच्च शिक्षणासाठी पैसे नव्हते. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी उरणच्या सामाजिक कार्यकर्त्यांना संघटीत केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पनवेल : लाभार्थींना अद्याप मिळाले नाही घर, आठ महिन्यांनंतरही महागृहनिर्माण प्रकल्पाची प्रक्रिया सुरूच

सर्वांच्या मदतीने उरण – पनवेल मधील दानशूर आणि सर्वसामान्य यांच्या मदतीने सागर अडतरावसाठी मदत निधी उभा केला. या निधीतून सागर शिवाय इतरही विद्यार्थ्यांना सहकार्य करता आले. याच निधीतून त्यांचेही शिक्षण पूर्ण होण्यास मदत झाली. सागरने मात्र उरणकरांच्या मदतीचं सोनं केलं. त्याने मेकॅनिकल इंजिनिअर पूर्ण करताना मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान त्याने मिळविला होता. पुढे M. E. चेन्नई येथे पूर्ण करून तो Ph.D. पूर्ण करण्यासाठी नेदरलँड् मध्ये गेला. आज त्याने ती पदवी यशस्वी रित्या पूर्ण करून परदेशातून Ph.D. पूर्ण करणारा तो उरण तालुक्यातील पहिला मुलगा ठरला आहे. ह्या खडतर प्रवासात उरण सामाजिक संस्थेने आणि माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासह अनेकांनी मदत केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran auto rickshaw driver son completes phd in philosophy at nederland css